बीड । सुशील देशमुख
बीड जिल्ह्यात जानेवारी ते फेबु्रवारी या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे 1 हजार 103 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर 33 टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करुन 28 फेबु्रवारी रोजी एकत्रित अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनास पाठवण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी ही माहिती दिली. शासन नियमाप्रमाणे पुढील आदेशानुसार शेतकर्यांना मदत मिळेल असे त्यांनी सांगीतले.
जिल्ह्यात 17 व 18 फेबु्रवारी रोजी अवकाळी पावसाने परळी,धारुर केज या तीन तालुक्यात मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. यात 33 टक्क्यांपेक्षा जास्त व 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या क्षेत्राची नोंद घेण्यात आली. त्यानुसार धारुर तालुक्यातील 445 शेतकर्यांचे 90.80 हेक्टर जिरायत, 61.40 हेक्टर बागायत असे एकूण 152 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. तसेच केज तालुक्यातील 253 शेतकर्यांचे 65.20 हेक्टर बागायत व 1.80 हेक्टर फळपिके असे एकूण 67 हेक्टर क्षेत्राचे अवकाळीने नुकसान झाले. तसेच परळी तालुक्यातील 60 शेतकर्यांचे 74 हेक्टर बागायत गव्हाचे क्षेत्र बाधित झाले. केज तालुक्यातील 814 शेतकर्यांचे 100 हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला आणि 105 हेक्टरवरील बागायत गव्हाचे नुकसान झाले. परंतू हे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा कमी आहे.याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.
याशिवाय इतर फळपिके सोडून इतर जिरायत पिकाखालील 33 टक्क्यांपेक्षा अधिकच्या बाधित क्षेत्राच्या नुकसानीची नोंद घेण्यात आली आहे. यात बीड तालुक्यातील 521 शेतकर्यांचे 423 हेक्टर,केज तालुक्यातील 1995 शेतकर्यांचे 888 हेक्टर आणि परळी तालुक्यातील 672 शेतकर्यांचे 840 हेक्टर असे एकूण 3188 शेतकर्यांचे 2151 हेक्टरवर 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेले आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने धारुर तालुक्यातील 154 शेतकर्यांचे 61.4 हेक्टर बागायत क्षेत्र बाधित झाले आहे तसेच केज तालुक्यातील 249 शेतकर्यांचे 65.2 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे पंचनाम्यातून समोर आले आहे. फळपिके सोडून जिरायत पिकांसाठी 6800 रुपये प्रति हेक्टर, तसेच बागायत क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 13 हजार 500 रुपये प्रमाणे शासन नियमानुसार मदतीची शेतकर्यांना प्रतिक्षा आहे.आता हा सर्व नुकसानीचा एकत्रित अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाला पाठवण्यात आला आहे असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी सांगीतले.
Leave a comment