बीड । वार्ताहर
देशात आणि राज्यामध्ये कोरोना लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली असून आता येत्या 1 मार्च पासून जेष्ठ नागरिकांसाठी खासगी रुग्णालयामध्ये ही लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयामध्ये ही लस मोफत देण्यात येणार असून खासगी रुग्णालयात केवळ 250 रुपयांमध्ये ही लस उपलब्ध होणार आहे.
जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीला देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले होते. केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यानंतर ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांचा यात समावेश असेल. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागतील. यात 100 रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश असेल, असे सरकारने जाहीर केले आहे.
नोंदणी कशी करायची
आपल्या मोबाईलवर को-विन अॅपवर ऑनलाइन नोंदणी,
- प्रत्यक्ष कोरोना लसीकरण स्थळीही नोंदणीची सोय
- 60 वर्षांवरील व्यक्तीला केवळ वयाचा पुरावा लागेल
-आधार कार्ड, पॅन कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून द्यावे लागतील.
- 45 ते 60 वयोगटातील व्यक्तींचा आजारपणाचे प्रमाणपत्र आवश्यक
- एका मोबाईल अॅपमधून चार जणांची नोंदणी शक्य
- आरोग्य सेतू अॅपच्या माध्यमातूनही नोंदणी करता येईल
- मोबाईल नसलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना 2.5 लाख सुविधा केंद्रे
- सुविधा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिक करु शकतात नोंदणी
- को-विन अॅपवरुन जवळचे लसीकरण केंद्रही शोधता येईल
दरम्यान, देशात आढळणार्या कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत नसल्याचे सरकारने म्हटले आहे. देशातील सध्याच्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 75 टक्के रुग्ण हे महाराष्ट्र आणि केरळ राज्यातील आहेत. या दोन्ही राज्यांत मागील काही काळापासून संसर्गात वाढ झाली आहे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेनंतर भारतात आहेत. भारतातील एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 10 लाख आहे. सरकारने केलेल्या अँटीबॉडीज सर्व्हेनुसार, देशातील 30 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ही माहिती दिली होते. प्रत्येक भारतीयाला ही लस देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
राज्यात असे होणार लसीकरण
राज्यामध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून याच अंतर्गत जिल्हास्तर, तालुकास्तर, समिती काम करणार आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावर नियंत्रण कक्षही ठेवण्यात आली आहे.
सरकारीच्या आखणीनुसार लस उत्पादन करणार्या कंपन्यांकडून ही लस चार मोठ्या कोल्ड स्टोअरेज केंद्रांमध्ये (कर्नाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता) पोहोचवली जाईल. तिथून पुढे ही लस राज्यांतर्फे चालवण्यात येणार्या 37 स्टोअर्समध्ये पाठवण्यात येईल. त्यानंतर ही लस जिल्हा पातळीवर पाठवण्यात येईल. कोरोना लस भारतात कोणत्या पद्धतीने सर्वांना दिली जाईल, याबाबत केंद्र सरकारने एक नियमावली 14 डिसेंबरला जाहीर केली होती. यानुसार एका वेळी एकाच व्यक्तीला लसीकरण केंद्रात जाण्यासाठी परवानगी असेल. राज्यांना दिलेल्या या सूचनांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत सांगण्यात आली आहे. लस घेणार्या लोकांना तसंच कोरोना व्हायरस लसीला ट्रॅक करण्यासाठी कोविन डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येईल. लसीकरण केंद्रांमध्ये फक्त नोंदणीकृत लोकांनाच लस दिली जाईल. त्यासाठीची प्राथमिकता ठरवण्यात येईल. लस टोचून घेण्यासाठी व्यक्ती आल्यानंतरच ती लस साठवलेल्या ठिकाणाहून बाहेर काढली जाईल. या नियमावलीनुसार, प्रत्येक सत्रात 100 जणांना लस दिली जाईल. संबंधित लसीकरण केंद्रात प्रतिक्षा कक्ष, निरीक्षण केंद्र, जास्त व्यक्तींना थांबण्याची व्यवस्था, तसंच मोठ्या प्रमाणात सामान ठेवण्याची व्यवस्था असेल, तर तिथं आणखी एक लसीकरण अधिकारी तैनात केला जाईल. त्यानंतर तिथं लसीकरण क्षमता 200 पर्यंत वाढवता येऊ शकेल.
Leave a comment