माजी सभापती खुर्शीद आलम यांचे सडेतोड पत्रक
बीड । वार्ताहर
पक्ष नेतृत्वांनी दिलेला आदेश मानायचा नाही, सामान्य नगरसेवकांना विश्वासात घ्यायचं नाही, आपण मात्र नगराध्यक्षांसोबत साटलोट करून स्वत:ची पोळी भाजून घ्यायची, गटनेत्यांचे दाखवायचे दात वेगळे अन् खायचे दात वेगळे अशी भूमिका घेतल्याने काकू-नाना विकास आघाडीचे सचिव हेमंतक्षीरसागर यांनी दगाबाजी करणार्या आघाडीच्या नगरसेवकांविरूद्ध अपात्रतेबाबत प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे दाखल केला. त्यामुळे नगराध्यक्षांसोबत साटलोट करणार्या गटनेत्यांनी भान ठेवून बोलावं नसता गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असे सडेतोड पत्रक नगर परिषद माजी सभापती खुर्शीद आलम यांनी दिले आहे.
पुढे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी नेहमीच सामान्य कुटुंबातील आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम केलं आहे. काकू-नाना विकास आघाडीच्या माध्यमातून सामान्य घरातील मुलं नगरसेवक केली. हे करत असतांना सभापती पदे मात्र गटनेते साहेब तुम्हीच पदरात पाडून घेतले. स्थायी समितीत तुम्हीच गेलात, तेंव्हा तुम्हाला मात्र सामान्यांची पोर आठवली नाहीत. काकू-नाना विकास आघाडी स्वतंत्र पक्ष आहे. त्याचे सचिव हेमंत क्षीरसागर आहेत, बीड नगर पालिकेत काकू-नाना विकास आघाडीचे नगरसेवक निवडुण आल्यानंतर गटस्थापन करून गटनेते म्हणून तुमची फारूक पटेल निवड करण्यात आली. सर्व अधिकार तुम्हाला देण्यात आले परंतू तुम्ही ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यांनी आदेश डावलले. त्यांच्या विरूद्ध कोणतीच कार्यवाही केली नाही. पक्षादेश बजावला नाही, एवढेच नव्हे तर नगराध्यक्षांसोबत तुम्ही हात मिळवणी करत तुमच्या संस्थेच्या नावावर पालिकेच्या हद्दीतील भुखंड करून घेतला. नुसरत अली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाच्या नावे सर्व्हे नं.27 गलगुजर तरफ नगराध्यक्ष अर्ध्या एक्करच्या आसपास जागा नावची करून देतात यामागचे गौडबंगाल काय? हे बीडकरांनाही कळु द्या. नगराध्यक्षांसोबत तुमचं साटलोट आहे हे आता सांगायची गरज नाही. ज्यांचे नाव घेवून तुम्ही कार्यवाही किंवा तक्रार का केली नाही? म्हणून असे विचारता ती तक्रार करण्याचा आणि अपात्रतेबाबत अपील करण्याचा अधिकार गटनेते म्हणून तुमचा होता. तुम्ही मात्र पदरात काही तरी पाडून गप्प बसलात आणि शेवटी पक्ष म्हणून काकू-नाना विकास आघाडीचे सचिव म्हणून हेमंत क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. यात तुमचं पोटसुळ उटण्या मागचं कारण समजलं नाही. नगराध्यक्षांविरोधात तर आमची लढाई सुरूच आहे. याबाबत आम्ही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी, नगरविकास मंत्री यांच्याकडे अपात्रतेबाबत तक्रारी दाखल केलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतलेली आहे. ज्या नगरसेवकांनी प्रवेश केला ते राष्ट्रवादीचे नव्हे तर काकू-नाना विकास आघाडीचे नगरसेवक असल्या कारणाने सचिव म्हणून मी ही तक्रार दाखल केलेली आहे. तुम्हाला इतकाच पुळका होता तर तुमची सभापती पदे यांना द्यायला का विरोध केला? आजपर्यंत गटनेते म्हणून तुम्ही का कोणत्याच तक्रारी केल्या नाही? का गप्प बसलात? याचा अर्थ काय? असे सांगत साटलोट आणि अंधारात हातमिळवणी करणार्यांना बोलण्याचा अधिकार नाही अस प्रसिद्धी पत्रकात न प माजी सभापती खुर्शीद आलम यांनी म्हटले आहे.
Leave a comment