13 वर्षांपूर्वी प्रियकरासोबत मिळून केली होती आपल्याच कुटुंबातील 7 जणांची हत्या
नवी दिल्ली:
भारत लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे इथे ना-ना प्रकारचे लोक आढळून येतात. गुन्हेगारीचं प्रमाणदेखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या गुन्ह्यांचं प्रमाण तसं कमीच आहे. मात्र, असं असलं तरीही आजवर एकाही महिलेला फाशी दिल्याची घटना स्वतंत्र भारतात घडली नाहीये. मात्र आता स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला फासावर लटकवलं जाण्याची घटना घडणार आहे. उत्तर प्रदेशातील मथुरामधील एकमेव अशा फाशीघरामध्ये अमरोहाची रहिवासी असलेल्या शबनमला मृत्युदंड दिला जाणार आहे. याबाबतची तयारी सध्या सुरु आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींना फासावर लटकावणाऱ्या मेरठच्या पवन जल्लाद यांनी देखील दोनवेळा फाशीघराचं निरीक्षण केलं आहे. मात्र, अद्याप या फाशीची तारीख निश्चित झाली नाहीये.
शबनमला फाशीची शिक्षा का झाली?
भारतात फाशीची शिक्षा होणे, ही खूपच गंभीर बाब मानला जाते. आतापर्यंत बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला यासारख्या कटातील गुन्हेगारांनाच फाशी देण्यात आली आहे. मात्र, शबनम ही स्वातंत्र्योत्तर काळात फाशीची शिक्षा देण्यात येणारी पहिली महिला ठरणार आहे.
2008 साली शबनमने आपल्या प्रियकराच्या मदतीने सात नातेवाईकांची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्दयीपणे हत्या केली होती. यामध्ये 10 महिन्यांच्या बाळाचाही समावेश होता. शबनम हिने कुऱ्हाडीने या सातही जणांचे शीर धडावेगळे केले. तिचा हा क्रूरपणा पाहून सर्वोच्च न्यायालयानेही शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्यास नकार दिला होता.
नक्की काय घडलं त्या रात्री?
अमरोहामधील हसनपूरजवळ असणाऱ्या बावनखेडी गावात राहणाऱ्या शबनमने सलीमच्या मदतीने २००८ साली १४ आणि १५ एप्रिलच्या मध्यरात्री आपल्या घरातील सात जणांची हत्या केली. यामध्ये शबनमचे वडील मास्टर शौकत, आई हाश्मी, भाऊ अनीस आणि रशीद, वहिनी अंजूम आणि तिची बहीण रबीया या सहा जणांना समावेश होता. शबनमने नंतर आपल्या लहान भाचालाही गळा आवळून मारुन टाकलं. सलीमसोबत असणाऱ्या आपल्या प्रेमाला कुटुंबाचा विरोध असल्याने शबनमने संपूर्ण कुटुंबाची हत्या केली.
१०० दिवस सुनावणी आणि ६४९ प्रश्न
अमरोह येथील न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी दोन वर्ष तीन महिने चालली. त्यानंतर १५ जुलै २०१० रोजी जिल्हा न्यायालयातील न्यामूर्ती एस. ए. ए. हुसैनी यांनी शबनम आणि सलीमला फाशीची शिक्षा सुनावली. शबनम आणि सलीम प्रकरणासंदर्भात तब्बल १०० दिवस न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यादरम्यान न्यायालयाने २९ साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेतले. १४ तारखेला साक्षीदार आणि पुरावे सादर करुन झाल्यानंतर पुढच्या दिवशीच अवघ्या २९ सेकंदांमध्ये न्यायालयाने दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणामधील सुनावणीदरम्यान एकूण २९ जणांनी ६४९ प्रश्न विचारले. १६० पानांचा निकाल न्यायालयाने दिला होता.
मथुरेतील 150 वर्ष जुन्या वधस्तंभावर दिली जाणार फाशी
उत्तर प्रदेशात महिलांना फाशी देण्यासाठी केवळ एकच वधस्तंभ आहे. हे ठिकाण मथुरेत आहे. शबनमला फाशी देण्यासाठी औपचारिक प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे फाशीची तारीख अद्याप निश्चित होऊ शकलेली नाही. मात्र, डेथ वॉरंट जाहीर झाल्यानंतर शबनमला लगेच फाशी दिली जाईल, अशी माहिती वरिष्ठ तुरुंग अधीक्षक शैलेंद्र कुमार मैत्रेय यांनी दिली.
10 महिन्यांच्या बाळावरही कुऱ्हाडीचे घाव
अमरोहा येथे राहणाऱ्या शबनमच्या कुटुंबात तिचे वडील, आई, भाऊ, त्याची पत्नी आणि त्यांचे महिन्यांचे बाळ यांचा समावेश होता. शबनम गावातील सलीम नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. मात्र, हे संबंध तिच्या वडिलांना मान्य नव्हते. त्यामुळे घरच्यांनी शबनमला सलीमशी संबंध तोडायला सांगितले.
सुरुवातीच्या काळात सलीमला भेटता यावे म्हणून शबनम आपल्या घरच्यांना झोपेच्या गोळ्या देत होती. घरचे लोक गाढ झोपल्यावर सलीम आणि शबनम घराच्या छतावर एकमेकांना भेटत. मात्र, थोड्याच दिवसांमध्ये या दोघांनी घरच्यांना ठार मारण्याचा धक्कादायक निर्णय घेतला.
14 एप्रिल 2008 च्या रात्री शबनमने सलीमला घरी बोलावले. त्यावेळी शबनमचे कुटुंबीय झोपेच्या गोळ्या खाल्ल्यामुळे गाढ झोपले होते. शबनम आणि सलीमने झोपेतच या सगळ्यांवर कुऱ्हाडीचे घाव घातले. यावेळी शबनमची एक लांबची बहीण राबिया हीदेखील त्यांच्या घरी आली होती. शबनमने तिलाहा ठार मारले. एवढेच नव्हे तर अवघ्या 10 महिन्यांच्या अर्श या बाळालाही शबनमने सोडले नाही. तिने कुऱ्डाडीचा घाव घालून या बाळाचे मुंडके छाटले.
आतापर्यंत एकाही महिलेला फाशी नाही
भारतातील महिलांना फाशी देण्याचं एकमेव ठिकाण मथुरेत आहे. मात्र याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. कारण अद्याप इथे कुणालाच फाशी दिली गेली नाहीये. याचं बांधकाम ब्रिटीश काळात 1870 मध्ये करण्यात आलं होतं. मथुरा जेलमध्ये 150 वर्षांपूर्वी महिला फाशीघर बनवलं गेलं होतं. मात्र, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कोणत्याही महिलेला फाशीची शिक्षा दिली गेली नाहीये. वरिष्ठ जेल अधिक्षक शैलेंद्र कुमार मैत्रेय यांनी म्हटलं की अद्याप तरी फाशीची तारीख निश्चित नाहीये. मात्र आम्ही तयारी सुरु केली आहे. डेथ वारंट जारी केल्याबरोबर शबनमला फाशी देण्यात येईल.
बिहारहून मागवली जाईल रस्सी
जेल अधिक्षकांच्या मते पवन जल्लाद यांनी फाशीघराचे दोनवेळा निरिक्षण केलं आहे. त्यांना काही बाबींमध्ये कमतरता आढळल्यानंतर त्या दुरुस्त केल्या जात आहेत. बिहारच्या बक्कसरमधून फाशीसाठी रस्सी मागवली जात आहे. जर शेवटच्या क्षणी काही अडचण उद्भवली नाहीच तर शबनम ही भारतातील अशी पहिली महिला ठरेल जिला स्वातंत्र्यानंतर फाशी दिली जाईल.
राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला
कोर्टाने दिलेल्या निर्णयाला दोषी शबनमने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टानेही कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर शबनम आणि सलीमने राष्ट्रपतींकडे दयेची याचिका केली होती. मात्र, राष्ट्रपतींनीही दया याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिला आरोपीला फाशी होणार आहे. देशात एकमेव मथुरा तुरुंगात महिला आरोपींना फाशी देण्याची व्यवस्था आहे. तिथे शबनमला फाशी दिली जाऊ शकते. ती सध्या बरेली तुरुंगात कैद असून, तिचा प्रियकर सलीम हा आग्रा तुरुंगात आहे.
Leave a comment