पोलीस ठाणे अधिकार्यांकडून मात्र मोहिमेला संथ प्रतिसाद
बीड । वार्ताहर
विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी बीड जिल्हा पोलिस दलाचा आढावा घेवुन फरार व पाहिजेत आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची सूचना बीड पोलिसांना दिलेली आहे. गत शनिवारपासून ही मोहीम पोलिसांनी हाती घेतली असून दि.16 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा पोलीसांनी जिल्ह्यातील विविध भागातून 53 आरोपींना ताब्यात घेतले आहे. महत्वाचे हे की, यातील 43 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहेत. उर्वरित केवळ 10 आरोपी पोलीस ठाणे स्तरावर पकडण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस ठाणे प्रभारींना आपल्या हद्दीतील फरार व पाहिजेत या प्रकारातील आरोपी पकडण्यासाठी वेगाने काम करण्याची गरज आहे.
वार्षिक तपासणीदरम्यान विशेष पोलिस महानिरीक्षकांनी फरार आरोपींबाबत आढावा घेतला होता. यात बीड जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील फरारी आरोपींची संख्या मोठी असल्याने त्यांना तात्काळ पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यात सध्या पाहिजे आरोपी 1054 तसेच फरार व स्टँडींग वॉरंटमधील 119 तर इतर गुन्ह्यातील 82 आरोपी फरार आहेत. दरम्यान 13 फेब्रुवारीपासून या आरोपींना पकडण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. परंतू पोलीस ठाणे स्तरावर मागील 5 दिवसात ताब्यात घेतलेल्या आरोपींची संख्या तुलनेने नगण्य आहे. गत पाच दिवसात जिल्ह्यात 53 आरोपी ताब्यात घेण्यात पोलीसांना यश मिळाले असले तरी यातील 43 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने पकडले तर पोलीस ठाणे स्तरावर केवळ 10 आरोपी पकडण्यात आले आहेत. अंमळनेर, धारुर, अंबाजोगाई ग्रामीण, बीड ग्रामीण पोलीसांनी हे आरोपी ताब्यात घेतले असल्याचे माहिती पोलीसांनी दिली.
Leave a comment