सर्वसामान्य कुटुंबातून स्वकर्तृत्वाने राजकारणात
आलेली गरिबांची पोरं का टार्गेट करताय?
बीड । वार्ताहर
बीड येथे काकू नाना विकास आघाडीचे बाळासाहेब गुंजाळ, भैय्यासाहेब मोरे, रंजीत बनसोडे, गणेश तांदळे व प्रभाकर पोपळे या पाच नगरसेवकांनी पक्षांतर केल्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यान्वये नगर परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी दाखल केलेली तक्रार अगदी योग्य आहे. पक्षांतर करणार्यांचे समर्थन माझ्याकडून कदापि होऊ शकत नाही त्यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मताचा मी आहे, परंतु उपाध्यक्षांचे चुलते नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, भाऊ नगरसेवक योगेश क्षीरसागर व भावजय नगरसेविका भारतीताई राजेश क्षीरसागर यांनी लोकसभेला भाजपा उमेदवार प्रीतमताई मुंडे व विधानसभेला शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांचा प्रचार खुलेआम केला होता. मग रक्ताचं नातं असल्यामुळेच उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी आपल्या चुलत्यावर, भावावर व भावजयीवर मेहरबानी केली आहे काय? सर्वसामान्यांसाठी वेगळा आणि क्षीरसागरांसाठी वेगळा कायदा आहे काय असा प्रश्न मला पडलेला आहे. तसेच मी नगराध्यक्षांसह पक्षांतर केलेल्या सर्व सदस्यांवर कारवाई करा असे स्थानिक नेतृत्वाला वारंवार सांगूनही त्यांनी नातेवाइकांना का अभय दिले हे मला न उमगलेले कोडे आहे असे पालिकेचे गटनेते फारुख पटेल यांनी पत्रकात म्हटले आहे.

सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन आपल्या स्वकर्तृत्वाने राजकीय अस्तित्व निर्माण करणार्या तसेच ज्यांनी जिवाचं रान करून आमदार संदीप क्षीरसागरांच्या विधानसभेतील विजयात भरीव योगदान दिलं अशा नगरसेवकांवर उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी कायद्याचा बडगा उगारलेला आहे, तो योग्यही आहे. चुलते नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, भाऊ योगेश क्षीरसागर व भाऊजाई भारतीताई राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात कारवाई न केल्यामुळे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत लोकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे, त्यामुळे लवकरच मी पक्षातील वरिष्ठांना भेटून सदरील बाब त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे असेही फारुख पटेल यांनी पत्रकात म्हटले आहे. गेल्या वर्षी व यावर्षी पालिका सभागृहात बहुमत होत असतानाही विषय समित्यांची (सभापती) निवडणूकच लढवली नाही. ही गंभीर बाब देखील पक्षातील वरिष्ठांच्या कानावर घालणार आहे. जर मागील दोन्ही वर्षी पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडणुका लढवल्या असत्या तर सर्वसामान्य कुटुंबातील आमचे सर्वच नगरसेवक सभापती झाले असते, परंतु समित्या बिनविरोध बहाल केल्यामुळे हे होऊ शकलं नाही अशी खंतही फारूक पटेल यांनी पत्रकात व्यक्त केली आहे.
---------
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment