परळी । वार्ताहर
येथील औष्णिक विद्युत केंद्रातील वीज वीजनिर्मिती मंगळवारपासून बंद करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत वीज निर्मिती केंद्र केवळ आर्थिक कारण पुढे करत बंद केले आहेत.
परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र.6, 7, 8 हे प्रत्येकी 250 मेगावॅट क्षमतेचे संच आहेत. या तिन्ही संचाची एकूण स्थापित क्षमता 750 मेगावॅट एवढी आहे. आता हे संच नेमके किती दिवस बंद राहणार आहेत, याबद्दलची माहिती मात्र मिळू शकलेली नाही. मंगळवारी सकाळी 12 च्या दरम्यान केंद्रातील संच क्र. 6 व संच क्र. 7 हे बंद करण्यात आले असून क्र 8 हा ही संच दुपारपर्यंत बंद केला जाणार असल्याची माहिती आहे. स्थानिक प्रशासनाकडे याबाबत चौकशी केली असता महाजनकोच्या वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाने चालु वीजनिर्मिती बंद केल्याचे सांगण्यात येत आहे. वीज निर्मीतीसाठी आवश्यक कोळसा या कच्च्या मालावरील खर्च वाढलेला असून वाढलेला उत्पादन खर्च कंपनीच्या आर्थिक धोरणांच्या निकषात बसत नसल्याचे सांगण्यात येत आहे. वीज निर्मितीला प्राधान्य देण्याऐवजी कंपनीच्या एमओडी (मेरिट ऑर्डर डिसपॅच) मध्ये बसत नसल्याने वीज निर्मिती करणे परवडत नसल्याचे कारण देऊन वीज निर्मिती पूर्णत: ठप्प करण्यात आली आहे.
बीडमध्ये दिवसभर वीज पुरवठा केला बंद
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच बंद केलेला असतानाच मंगळवारी कोणताही ब्रेक नसताना दिवसभर बीड शहरातील वीज पुरवठा महावितरकडून बंद ठेवण्यात आला होता. कारण विचारले असता, दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी 7 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंदच होता, त्यामुळे वीज ग्राहकांचे बेहाल झाले.
Leave a comment