दिल्ली पोलीसांकडून बीडमध्ये येवून चौकशी; संशयितांची घेतली झाडाझडती
बीड । वार्ताहर
प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीत हिंसाचार उसळला होता. यावेळी सरकारी वाहनांची तोडफोडही झाली होती. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला यामुळे गालबोट तर लागलेच होते, शिवाय दिल्लीतील हा सर्व प्रकार संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय बनला होता. दरम्यान या हिसांचारानंतर दिल्ली पोलीसांकडून सीसीटिव्ही फुटेज तपासत अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे अनेकांवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल झालेले असून त्याचा तपासही सुरु आहे. याच तपासाच्या अनुषंगाने शनिवारी (दि.13) रात्री दिल्ली सायबर शाखेचे पोलीस अधिकारी व त्यांचे पथक माहिती घेण्यासाठी बीडमध्ये धडकलेे. बीडच्या शिवाजीनगर ठाण्यातील अधिकार्यांची चर्चा करुन नंतर या पथकाने शहरातील काही जणांचे पत्ते शोधून काढत झाडाझडती घेत त्यांची चौकशीही केल्याची माहिती समोर आली आहे.
शनिवारी रात्री साधारण नऊच्या सुमारास दिल्ली सायबर सेलचे पो.नि.सज्जनसिंग व त्यांच्या पथकातील कर्मचारी बीडमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर चौकशीच्या अनुषंगाने त्यांनी बीड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केली. एखाद्या गुन्ह्यासंदर्भात पोलीस हद्दीबाहेर जावून चौकशी करण्यासाठी संबंधित ठाणे प्रमुखांची परवानगी घ्यावी लागते,त्यानुसार दिल्ली पोलीसांनी शिवाजीनगर ठाण्यात येवून त्यांना हव्या असलेल्या संशयितांच्या पत्त्याबाबत तसेच अधिकची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्याकडून जाणून घेत शहरातील काही राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या पदाधिकार्यांची चौकशी केली. अधिक तपासासाठी काही जणांना ताब्यातही घेतल्याची खास सुत्रांकडून समोर आली आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलीसांनी मात्र याबाबत अधिक माहिती दिली नाही. आवश्यक ती माहिती जाणून चौकशी करुन सायबर सेलचे पोलीस पुन्हा दिल्लीला रवाना झाले. शिवाजीनगर ठाणे हद्दीतून काही संशयितांची पोलीसांनी कसून चौकशी केली असून या चौकशीदरम्यान नेमके कोणाला ताब्यात घेतले हे मात्र अद्याप समोर आलेले नाही;पंरतु दिल्लीत प्रजासत्ताक दिनादिवशी झालेला प्रकार व त्या प्रकरणाच्या चौकशीकामी दिल्ली सायबर पोलीस बीडमध्ये पोहचल्याने दिल्ली प्रकरणाचे बीड कनेक्शन नेमके काय? अशी प्रश्न उपस्थित होत आहे.
कारवाईबाबत माहिती घेणार-आर.राजा
शनिवारी दिल्ली सायबर पोलीस त्यांच्या गुन्ह्याच्या संदर्भात चौकशीसाठी बीडमध्ये आले होते. यादरम्यान काही जणांना ताब्यात घेतले आहे की नाही,याबाबत माहिती जाणून घेतली जात आहे. माहिती घेवून या कारवाईबाबत सांगतो, अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी लोकप्रश्नशी बोलताना दिली.
दिल्लीतील गुन्ह्याच्या तपासासाठी चौकशी
दिल्ली येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या तोडफोडी प्रकरणी दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा दिल्ली सायबर पोलीस तपास करत आहेत. या गुन्ह्याच्या तपासकामी शनिवारी दिल्ली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सज्जनसिंग व त्यांचे पथक माहिती घेण्यासाठी ठाण्यात येवून भेटले. त्यांनी काही जणांची गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली आहे, ते अधिक तपास करत आहेत अशी माहिती शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी दिली.
Leave a comment