क्षीरसागर काका-पुतण्याच्या विरोधात तिसरी आघाडी!
न.प.ला वर्षाचा कालावधी
नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागरांकडूनही फिल्डींग
बीड । वार्ताहर
विधानसभा निवडणूक नंतर आ.संदीप क्षीरसागर यांचे बीड विधानसभा मतदार संघात राजकीय वर्चस्व निर्माण होईल असा अंदाज विधानसभा निवडणूकीतील परिस्थितीवरुन बांधला होता. मतदासंघात ते विकासकामासंदर्भात लक्ष देत असले तरी त्यांच्या राजकीय ताकदीची त्यांनीच बांधलेली ‘चुंबळ’ ढिल्ली होवू लागल्याचे चित्र आहे. गत दोन-तीन वर्षात त्यांच्या राजकीय सारीपाटाचा खेळ व्यवस्थित कसा होईल यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे अमर नाईकवाडे, फारुक पटेल, गंगाधर घुमरे यांच्यासह नाराजांची फौज वाढु लागली असुन विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर अन् विद्यमान नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर पुतण्याच्या विरोधात तिसरी आघाडी तयार होवू लागली आहे.
शहरातील चौकाचौकात ‘तिसरी आघाडी’ काका पुतण्याला पर्यायी ठरू शकते का? याची चर्चा सुरु आहे. बीडचे राजकारण कायम क्षीरसागर कुटूंबाशी निगडीत राहिले आहे. निवडणूका स्थानिक स्वराज्यच्या असो की विधानसभा,लोकसभेच्या. या निवडणूकीत क्षीरसागरांना मानणारा मतदार आहे. दरम्यान असे असले तरी गत नगरपालिका निवडणूकीत क्षीरसागर कुटूंबात दोन राजकीय विचारधारा निर्माण झाल्या अन् त्यातून नगरपालिकेत काकू-नाना आघाडी उदयास आली. शिवाय नंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीतही पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला. यादरम्यान बर्याच राजकीय उलथापालथी झाल्या, त्या संबंध जिल्ह्याने पाहिल्या. मात्र आता ही राजकीय स्थितीही बदलत चालली आहे. मागील चार महिन्यांपासून तर बीडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारीच राष्ट्रवादीचे आ.संदीप क्षीरसागर यांच्यापासून दूर जात आहेत. यामागे काय कारणे आहेत? पक्ष सत्तेत असताना कार्यकर्ते का दुरावू लागले आहेत याचा विचार आ.संदीप क्षीरसागरांनी करण्याची वेळ आली आहे. कारण मध्यंतरी काकू-नाना आघाडीच्या नगरसेविका आश्विनी बाळासाहेब गुंजाळ यांच्या शिवसेना प्रवेशानंतर, काकू-नाना आघाडीचे आ.संदीप क्षीरसागर गटाचे रणजित बनसोड, भैय्यासाहेब मोरे, प्रभाकर पोपळे व गणेश तांदळे यांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांचे नेतृत्व स्विकारुन आमदार क्षीरसागर यांना धक्का दिला. दरम्यान ही सारी स्थानिक पातळीवरील समीकरणे वेगाने बदलत असताना आता काकू-नाना आघाडीचे न.प.तील गटनेते फारुक पटेल आणि नगरसेवक अमर नाईकवाडे हे ही आ.संदीप क्षीरसागर यांच्यापासून दूरावत चालल्याचे चित्र बीडमध्ये दिसून येत आहे. मागील साधारण तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे यांनी बीडमधील कंत्राटदाराविरुध्द जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली. या तक्रारीचे निवेदन दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात चांगलीच चर्चा झाली. दरम्यान याचवेळी राष्ट्रवादीचे बीडमधील जेष्ठ मार्गदर्शन डी.बी.बागल यांनी एक पत्रक काढून तक्रार करणारे गंगाधर घुमरे, फारुक पटेल आणि नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्याविरुध्द टोकाचे विधान करत पक्षातून बाहेर पडण्याचाही सल्ला दिला होता. त्यावेळी पडलेली विरोधाची ही पहिली ठिणगी नंतर वाढतच चालली आहे.
बीड मतदार संघात राष्ट्रवादीचे आ.संदीप क्षीरसागर असताना त्यांना डावलून दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्याच बीडमधील पदाधिकार्यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात जावून पालकमंत्री धनंजय मुंडे यांना बीड शहरातील काही विकास कामे तसेच तालुक्यातील नाळवंडी जि.प.गटातील रस्ता कामासाठी निधीची मागणी केली. दरम्यान बीडच्या आमदारांना निवेदन न देता बीडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी पालकमंत्री यांना भेटल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या. एकंदरच राष्ट्रवादीच्याच पदाधिकार्यांमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या महत्वाच्या पदाधिकार्यांमध्ये समन्वय राहिला नसल्याचे यातून अधोरेखित होत आहे. आगामी वर्षभरात बीड न.प.ची निवडणूक होत आहे. त्यामुळे आत्ताच पक्षात फोफावत जाणारी गटबाजी आणि त्याचे होणारे दुरगामी राजकीय परिणाम लक्षात घेता राष्ट्रवादीची मतदार संघावरील पकड कमी व्हायला वेळ लागणार नाही.अशावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आपापसातील रुसवे-फुगवे बाजूला सारुन पुन्हा पक्ष संघटनासाठी एकत्र येणार की, या गटबाजीचा फायदा शिवसेना घेणार? की दोन्ही क्षीरसागरांना बाजूला ठेवून तिसरी आघाडी अस्तित्वात येणार अशा चर्चा आता बीड मतदार संघात होवू लागल्या आहेत.
नगराध्यक्षांची जोरदार फिल्डींग
बीड नगरपालिकेच्या राजकारणामध्ये काका विरुध्द पुतण्या अशी लढत होईल अशी चर्चा सुरु झालेली असतानाच आ.संदीप क्षीरसागर यांच्या काही समर्थकांनी काका-पुतण्यांच्या विरोधात तिसर्या आघाडीचा पर्याय उभा करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. विद्यमान नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी पुतण्या आ.संदीप क्षीरसागर यांची फौज खिळखिळी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. याबरोबरच शहरातील मतदारांशी प्रत्यक्ष गाठीभेटी घेवून त्या-त्या भागातील अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. एवढेच नव्हे तर प्रलंबित पडलेली रस्त्यांची कामे युध्दपातळीवर पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. चोहोबाजुंनी होणारा विरोध लक्षात घेवून प्रत्येक वार्डामध्ये संभाव्य उमेदवार तयार करुन नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी सोबत येतील त्यांना सोबत घेवून तर जे येणार नाहीत त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. नोव्हेंबरमध्ये होणार्या निवडणूकीसाठी आत्तापासूनच नगराध्यक्षांनी फिल्डींग लावली आहे.
Leave a comment