तीन ठिकाणी घरफोडी; लाखोचा ऐवज लांबवला
बीड | वार्ताहर
पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी आणि नफरवाडी येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालुन तीन ठिकाणी घरफोडी केली. या घटनेत लाखोंचा ऐवज चोरट्यांनी हातोहात लंपास केला. 4 व 8 फेब्रुवारीला घडलेल्या या घटनेप्रकरणी अनुक्रमे अंमळनेर व पाटोदा ठाण्यात अज्ञाताविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पाटोदा तालुक्यातील नफरवाडी येथे सोमवारी भरदिवसा सकाळी 10 ते दुपारी 4 च्या सुमारास चोरट्यांनी शेतकरी नामदेव विठ्ठल मंडलीक यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला नंतर कपाटातील सोने व चांदीचे दागिने तसेच नगदी रक्कम लंपास केली.नंतर चोरट्यांनी मंडलीक यांच्या घराशेजारी राहणार्या ज्ञानोबा तांबे यांच्या घराचे कुलूप तोडून आतील लोखंडी पेटीत ठेवलेली सोन्याची नत असा एकुण 10 लाख 9 हजाराचा ऐवज लंपास केला. दुसरी घटना अंमळनेर ठाणे हद्दीतील पिंपळवंडी येथील पाटील वस्तीवर घडली. चोरट्यांनी हनुमंत भगवान पवार यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्याचे 74 हजार रुपये किंमतीचे विविध दागिने लंपास केले. याप्रकरणी अंमळनेर ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
नेकनूरच्या बाजारात मोबाइल चोर सक्रिय
नेकनूर येथे रविवारी भरणार्या आठवडी बाजारात मोबाइल चोर सक्रिय झाले आहेत. रविवारी (दि.7) भाीजपाला खरेदीसाठी गेलेल्या रामहरी विठ्ठल लेहने (रा.रत्नागिरी ता.बीड) यांच्या शर्टच्या खिशातील 15 हजार रुपये किंमतीचा मोबाइल चोरट्यांनी हातोहात लंपास केला. याप्रकरणी सोमवारी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
गढीमध्येही घरफोडी
गेवराई तालुक्यातील गढी या ठिकाणी सोमवारी (दि.8) पहाटेच्या सुमारास घरफोडीची घटना घडली. येथील भवानीनगरमध्ये राहणार्या ज्ञानेश्वर एकनाथ लव्हाळे या विद्यार्थ्याच्या घराचे कुलूप तोडून आत शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी सोमवारी अज्ञाताविरुद्ध गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
Leave a comment