बीड | वार्ताहर
बेकायदेशीर खालसे करणार्या भ्रष्ट अधिकार्यांवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने बुधवारी (दि.10) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय महासचिव प्रा.सुशीलाताई मोराळे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, भुसुधार विभागाचे उपजिल्हाधिकारी आघाव हे शासन राजपत्रातील नोंदणी असलेल्या शासन राजपत्र व गाव नमुना 9 मध्ये नोंद असतांना बेकायदेशीरपणे कोट्यावधी रुपयांची सेवा इनाम जमीन खालसा करुन विक्रीसाठी परवानगी देत आहेत. तसेच सेवा इनाम जमीन असतांना तहसीलदार देखील अहवाल सादर करुन सेवाइनाम जमीन खालसा करण्यासाठी पंचनामे करुन देत आहेत. गेवराई तालुक्यातील उक्कडपिंप्री येथील सर्व्हे नं.8 मधील 5 एकर 17 गुंठे जमिनीच्या सातबार्यावर गैर इनामदार यांच्या मालकी रखान्यामध्ये नावे नोंद करण्यात आलेली आहे. या जमिनीवर न्यायालयाचा मनाई हुकूम असतांनासुद्धा कायद्याची पायमल्ली झाल्याचे प्रकार घडलेले आहेत. तसेच धारुर, आष्टी तालुक्यातील काही सर्व्हे नं.मधील जमीन खालसा करण्यात आली आहे. अंबाजोगाई, बीड मधील असेच प्रकार घडले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषी अधिकार्यांवर निलंबनाची कारवई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम आदी उपस्थित होते.
Leave a comment