नऊ दिवसांची पोलीस कोठडी
बीड । वार्ताहर
अधिक व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधींच्या ठेवी गोळा करुन नंतर ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी परळी येथील माऊली मल्टीस्टेटच्या पदाधिकार्यांवर गुन्हा नोंद झाला होता. यातील मुख्य आरोपी विष्णू भागवत याला सोमवारी (दि.8) आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक कारागृहातून ताब्यात घेतले. मंगळवारी आरोपीस अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी दिली.
परळीतील माऊली मल्टीस्टेट को -ऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेने जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवी गोळा केल्या होत्या. मात्र, मुदत उलटल्यानंतर ठेवी परत करण्यास टोलवाटोलवी करण्यात आली. 2019 मध्ये मल्टीस्टेटने गाशा गुंडाळल्यावर ठेवीदारांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ठेवीदारांनी मल्टीस्टेटच्या पदाधिकार्यांना संपर्क केला असता त्यांना केवळ आश्वासने देण्यात आली. यात वर्ष उलटून गेलेे. अखेर ठेवीदार अरुण मुळे (रा.नक्षत्रवाडी, औरंगाबाद) यांच्यासह एकूण 14 ठेवीदारांनी परळी शहर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरुन 11 सप्टेंबर 2020 रोजी एकूण एक कोटी 28 लाख 66 हजार 699 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चेअरमन ओमनारायण जैस्वाल, सचिव संगीता ओमनारायण जैस्वाल आणि विष्णू रामचंद्र भागवत (रार. वंडगाव ता.येवला जि.नाशिक) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. हा गुन्हा तपाससाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला. आर्थिक गुन्हे शाखेने चेअरमन ओमनारायण जैस्वाल याला औरंगाबादेतील वाळूज परिसरातून 22 जानेवारी रोजी अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून संगीता जैस्वाल फरार आहे. दरम्यान, तिसरा आरोपी विष्णू भागवत हा नाशिक कारागृहात होता. विविध कंपन्या स्थापन करुन त्याद्वारे ठेवी गोळा करुन फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यास सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक कारागृहातून तपासकामी ताब्यात घेतले. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, पोहेकॉ राजू पठाण यांनी त्यास रात्रीतून बीडला आणून परळी शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.
Leave a comment