अवैध वाळू उत्खनन आतातरी रोखणार का?
बीड । वार्ताहर
कोरोना संकटकाळामुळे गत एक वर्षापासून रखडलेली वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया अखेर 28 जानेवारी 2021 च्या निर्णयानुसार सुरु करण्यात आली आहे.या वाळू घाटांचे लिलाव करण्यासाठी 12 फेब्रुवारीला पहिली फेरी होणार असून त्यानंतर 25 फेब्रुवारीला दुसरी तर 12 मार्च ला 3 री फेरी होणार आहे. जिल्ह्यातील 21 वाळू घाटांचे लिलाव एकाच वेळी होत असून यासाठी प्रशासनाच्या अटी व शर्तींना अधिन राहुन सर्व संबंधितांना वाळू घाटांची लिलावाची निर्धारित रक्कम (अपसेट प्राईज) प्रशासनाने जाहीर केली आहे. दरम्यान वाळू घाटाचे लिलाव सुरु झाल्याने आता चोरट्या मार्गाने होणारी वाळू चोरी रोखली जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे पण अवैध वाळू उत्खनन खरेच रोखले जाईल का असा प्रश्न निर्माण होत आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील 17, माजलगाव तालुक्यातील 3 व परळी तालुक्यातील 1 अशा 21 वाळू घाटांचा ई लिलाव करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्या आहेत. त्यानुसार गेवराई तालुक्यातील बोरगाव, पाथरवाला, सुरळेगाव, पांचळेश्वर, राक्षसभुवन, म्हाळस पिंपळगाव, सावळेश्वर, सावरगा नि., नागझरी, संगमजळगाव, हिंगणगाव 1, हिंगणगाव 2, बोरगावथडी, गंगावाडी 1, राजापुर 1, राजापूर 3 व काठोडा तसेच माजलगाव तालुक्यातील रिधोरी, गव्हाणथडी, आडोळा व परळी तालुक्यातील डिग्रस 2 या वाळू घाटांच्या लिलावास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी राज्यस्तरीय पर्यावरण आघात मुल्यांकन समितीनेही मान्यता दिली आहे. यासाठी प्रत्येक वाळू घाटाच्या वेगवेगळ्या अपसेट प्राईज व लिलावात सहभागी होण्यासाठी भरावयाच्या अनामत रकमा प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. येत्या 30 सप्टेंबर 2021 पर्यंत या वाळू घाटाचा कालावधी असणार आहे. वाळू घाटांचे लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यक्ती, संस्थांना सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेतच नियमाच्या अधिन राहुन संबंधीत वाळ घाटाच्या क्षेत्रावरील वाळू उत्खनन करता येणार आहे.
Leave a comment