दोन अनोळखी महिलांविरुध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा
बीड । वार्ताहर
कर्ज देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्या महिलांनी व्यापार्याकडून तब्बल 2 लाख 65 हजार 200 रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापार्याने शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा नोंद झाला.
बीड शहरातील व्यापारी कैलास दिनकर गोरे यांना 10 नोव्हेंबर रोजी आशा वर्मा (रा.नोएडा,दिल्ली) नामक महिलेने कॉल करून कर्जाची मागणी आहे का? अशी विचारणा केली.त्यामुळे कैलास यांनी त्या महिलेस व्हॉट्सपद्वारे कागदपत्रे पाठवली. त्यानंतर अंकिता नामक महिलेने कैलासला कॉल करून दहा लाखांपर्यंतच्या रकमेचे कर्ज देण्याची तयारी दाखवली. परंतु, कैलास गोरे यांनी केवळ सहा लाखांची मागणी करताच तिने मुद्रा फायनान्समधून तेवढी रक्कम कर्जाने देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर कर्ज मंजुरीसाठी प्रोसेसिंग फीस, स्टॅम्प ड्युटी, इन्शुरन्स, जीएसटी, एनओसी अशा विविध बहाण्याने गोरे यांच्याकडून 2 लाख 65 हजार 200 रुपये जमा करून घेतले आणि बनावट युटीआर क्रमांक दिला.खात्यावर पैसे न आल्याने कैलासने अंकिताला कॉल केला असता तुम्ही एनओसी साठीची रक्कम भरण्यास उशीर केल्याने तुम्हाला पैसे भेटू शकत नाहीत, डीडी काढून देते असे सांगितले. गोरे यांनी त्यास नकार दिला आणि त्यांच्याकडे जमा केलेली रक्कम परत देण्याची मागणी केली.तेंव्हा तिने 1 जानेवारी रोजी रक्कम खात्यावर जमा होईल असे सांगितले. त्या तारखेलाही रक्कम न आल्याने गोरेंनीे तिला पुन्हा कॉल केला. त्यावेळी तिने डीडी साठी आणखी 60 हजार रुपयांची मागणी केली. मात्र व्यापार्याने नकार दिल्याने पैसे परत मिळणार नाहीत असे म्हणत तिने फोन बंद केला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने व्यापारी गोरे यांनी शिवाजीनगर ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यावरून आशा वर्मा आणि अंकिता या दोन महिलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
कर्ज घेण्याच्या नादात होऊ शकते मोठी फसवणूक, असे ओळखा खरे अॅप
कोरोनाच्या महामारीमध्ये अनेकांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. त्यामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांची संख्या वाढली आहे. याचाच गैरफायदा घेत अनेक खोटे अॅप तयार करून फसवणूकीची प्रकरणं समोर आली आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका अशा सूचना वारंवार दिल्या जात आहे.
सध्या कर्ज देण्यासाठी अनेक नवीन अॅप बाजारात आले. यामध्ये लवकर कर्ज मिळवण्यासाठी आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर इत्यादी माहिती दिली असता लगेच कर्ज मिळतं. पण नंतर या अॅपद्वारे फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कुठल्याही अॅपमध्ये माहिती भरण्याआधी तो खरा आहे की खोटा हे तपासून घ्या…
या 5 पद्धतीने तपासा अॅप खरा की खोटा?
1. सिबिल स्कोअरसंबंधी गंभीर नाही
जर तुम्ही कर्ज घेण्यासाठी एखाद्या अॅपशी संपर्क केला आणि ती कंपनी जर तुम्ही कसे कर्ज फेडणार आहात आणि तुमचा सिबिल स्कोअर चांगला आहे का? हे पाहण्यात गंभीर नसेल तर सावधान राहा. कारण कोणताही खरा अॅप तुमचा सिबिल स्कोअर चांगला आहे का? याची पाहणी नक्की करेन. पण जर एखाद्या अॅपने असं न करता थेट कर्जासाठी तुमची कागदपत्रं मागितली तर लगेच शेअर करू नका.
2. अंतिम मुदतीत अर्ज करण्यासाठी दबाव
जर एखादी कंपनी अंतिम मुदतीत कर्ज घेण्यासाठी दबाव टाकत असेल तर हे योग्य नाही. कारण कर्जाची गरज तुम्हाला आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि फायद्यासोबत कर्ज घेण्याचा पर्याय निवडू शकता.
3. शुल्काची कोणतीही माहिती नाही
जर अॅपमध्ये कर्जाचा अर्ज, क्रेडिट रिपोर्टच्या फी संदर्भात तपशील दिलेला नसेल किंवा त्यांसंबंधी कुठलाही खुलासा केला गेला नाही तर त्या संबंधित अॅपमधून कर्ज घेण्याचं शक्यतो टाळा.
4. कंपनीची वेबसाइट सुरक्षित आहे की नाही?
कर्ज घेण्यासाठी जर तुम्ही एखाद्या अॅपची निवड केलीत तर अॅपच्या वेबसाइटवर नक्की जा. यामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला सुरक्षित वाटली नाही तर तुम्ही सावधान व्हा. नाहीतर यातून तुमची मोठी फसवणूक होऊ शकते.
5. कंपनीचा किंवा अॅपचा पत्ता शोधण्याचा नक्की प्रयत्न करा
जर कोणत्याही अॅपद्वारे तुम्ही कर्ज घेण्याचा प्लॅन करत असाल तर सगळ्यात आधी अॅपचा मालकी हक्क असणाऱ्या कंपनीचा पत्ता नक्की शोधा. जर कंपनीचा पत्ता वेबसाइटवर दिसला नाही तर अशा अॅप्समधून कर्ज घेऊ नका.
Leave a comment