केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या तक्रारीनंतर जिल्ह्यात चर्चेला उधाण
बीड । वार्ताहर
केंद्रामध्ये मोदी सरकार आल्यानंतर गेल्या वर्षोच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामधून जवळपास 13 महामार्ग गेले आहेत. त्यापुर्वी कल्याण विशाखापट्टणम आणि धुळे सोलापुर या दोन महामार्गाचे काम अंतिम टप्पयात आले होते मात्र त्यानंतर जवळपास 11 महामार्ग यामध्ये पालखी मार्गाचाही समावेश असून या महामार्गाच्या कामामध्ये काही आमदारांनी कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केल्याच्या तक्रारी केवळ बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्याच्या अनेक ठिकाणाहून आल्या होत्या. दोन वर्षापुर्वी जालना येथे एका महामार्गाच्या कामाच्या शुभारंभ कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या संदर्भात कामाच्या गुणवत्ते बरोबरच लोकप्रतिनिधींनी पैसे मागितल्याचा उल्लेख केला होता. काही दिवसापुर्वी महामार्गाच्या कामात ठेकेदारांवर दबाव टाकून टक्केवारी मागणार्या 22 आमदारांसह काही, खासदारांच्या विरोधात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी थेट केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार केली आहे. यामध्ये बीडच्या दोन आमदारांची नावे असल्याची चर्चा गेल्या आठवडा भरापासून आहे हे दोन आमदार कोण असा प्रश्न सर्व सामान्य जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये विचारला जात आहे.
बीड जिल्ह्यातून जाणार्या धुळे सोलापुर मार्गाचे काम आयआरबी कंपनीमार्फत ज्यावेळी सुरू झाले त्यावेळी त्यातील काही काम आपल्या कार्यकर्त्याला द्यावे त्यासाठी त्या त्या विधानसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधीनी कंपनीच्या अधिकार्यावर दबाव टाकल्याची तक्रार त्यावेळी ही झाली होती. मात्र, आय आर बीच्या अधिकार्यांनी याकडे लक्ष दिले नाही. एवढेच नव्हे तर बीड शहरातून जाणार्या बिंदूसरा नदीवरील पुलाच्या कामातही संबंधीत कंपनीला एका लोकप्रतिनिधीने मोठी रक्कम मागितल्याची चर्चाही त्यावेळी झाली होती.
शासकीय निधीतून होणार्या कामांत लोकप्रतिनिधी आणि पक्षांच्या पदाधिकार्याकडून ठेकेदारावर दबाव टाकून टक्केवारी मागणे आणि विशेषत: स्वत:च्या मतदारसंघात मंजूर करुन आणलेली कामे ठेकेदाराला देण्यासाठी टक्केवारी घेतल्याचा प्रकार जिल्ह्याला नवा नाही यापुर्वीही असे प्रकार अनेक घडले आहेत. मात्र पालखी मार्ग आणि इतर महामार्गाचे काम करणार्या कंपनीच्या कंत्राटदारांना धमक्या देवून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल करण्याचे प्रकार अलीकडे वाढलेआहेत. केवळ बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर नांदेड पासून औरंगाबाद पर्यत महामार्गाच्या कामामध्ये अशा स्वरूपाच्या तक्रारी कंत्राटदारांनी आणि कंपनीच्या अधिकार्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्या होत्या. त्यामुळे एकीकडे कामाची गुणवत्ता राखण्याची मागणी करायची आणि दुसरीकडे त्याच कंपनीकडून पैसे मागायचे हा प्रकार गडकरींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या संदर्भात काम करणार्या कंपनींचे अधिकारी आणि कंत्राटदारांकडून संविस्तर लेखी स्वरूपात तक्रारी प्राप्त करून घेतल्या आणि स्वतः केंद्रीय गुन्हा अन्वेशन विभागाकडे सविस्तर तक्रार केली आहे. ही तक्रार केल्याची बातमी वृत्त पत्रात आल्यानंतर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींच्या नावाची चर्चा होवू लागली. गेल्या आठवडाभरापासून बीड जिल्ह्यातील दोन आमदारांची नावे चर्चेत आहेत.
गडकरींनी अनेक वेळा भाषणातून असले घाणेरडे प्रकार टाळण्याचे आवाहन करुनही काही लालची लोकप्रतिनिधींना मोह आवरला नाही. त्यामुळे नितीन गडकरी यांनी मराठवाडा, कोकण आणि विदर्भातील ठेकेदाराला टक्केवारी मागणार्या 22 आमदारांसह काही खासदारांची यादीच सीबीआयला सादर केली आहे. याची चौकशी करुन कारवाईच्या सूचनाही दिल्या आहेत. दरम्यान, या यादीमध्ये बीड जिल्ह्यातील दोन आमदारांंची नावे असल्याची माहिती खात्रीलायक वृत्तांने दिली आहे. या प्रकाराची चर्चा होवू लागल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
आ.सोळंके दिल्लीत
माजलगावचे आमदार तथा माजी मंत्री प्रकाश सोळंके हे आपल्या काही कामानिमित्त दिल्लीत गेले आहेत. गडकरींच्या तक्रारींची बातमी येणे आणि आ.सोळंके दिल्लीत जाणे यामुळे ही तर्क वितर्कला उधान आलेआहे. दरम्यान आ.सोळंके हे मतदार संघातील विविध विकासाच्या कामा संदर्भात दिल्लीमध्ये गेले असल्याची माजलगावात चर्चा आहे. या संदर्भात थेट प्रकाश दादांशीच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांंच्याशी संपर्क होवू शकला नाही.
Leave a comment