नागरिकातून संताप; महामार्ग विभागाचे दुर्लक्ष
आष्टी । वार्ताहर
नगर-बीड राष्ट्रीय महामार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम करण्यात आले असून या रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, यासाठी अत्यल्प प्रमाणात मुरूम वापरला जात आहे. त्यामुळे आधीच 10 इंचापर्यंत खाली गेलेल्या साईडपट्ट्या पावसाळ्यात पुन्हा वाहून जावून अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
नगर-जामखेड-बीड हा राज्यमार्ग नुकताच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित असून निधीअभावी ते पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली वाताहत व नित्यरोज होणारे अपघात लक्षात घेता रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पुढे येत होती. या रस्त्याच्या आहे त्याच स्थितीत मजबुतीकरणाचे कामाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आला होता. त्यास मार्च महिन्यामध्ये मंजुरी मिळाली. मात्र, कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आठ महिने उशिराने हे काम संबंधित विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. तालुका सरहद्दीवरील चिंचपूर गावापासून ते आष्टीपर्यंत 15 किलोमीटर अंतराचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून सध्या रस्त्याच्या साईडपट्ट्या भरण्याच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. मात्र, यासाठी अत्यल्प प्रमाणात मुरूम पसरविण्यात आला आहे. त्यामुळे केलेल्या या साईडपट्ट्या निव्वळ फार्स ठरण्याची शक्यता असून पावसाळ्यात त्या वाहून जावून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता तारडे म्हणाले, साईडपट्ट्यांच्या कामासाठी रस्त्यापेक्षा जास्त उंचीचा मुरूम पसरवून त्यावर पाणी मारून रोलरच्या सहाय्याने दबई करण्यात येते. रस्त्याच्या लेव्हलपर्यंत या मुरूमाची दबई होणे आवश्यक आहे. सध्या ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात खचलेल्या आहेत, तेथे काम हाती घेण्यात आले आहे. संबंधित कंत्राटदाराकडून नियमाप्रमाणे सर्व कामे करून घेण्यात येतील.
Leave a comment