बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोना विरुध्दच्या लढ्यात अग्रभागी असलेल्या आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचार्यांना सर्वांत प्रथम ही लस देण्याचे काम सुरु आहे, त्यानंतर आता या लसीचा दुसरा मान महसूल विभागाला जाणार आहे. त्यासाठी महसूल कर्मचार्यांची माहिती कोविन पोर्टलवर नोंदविण्याचे काम सध्या सुरु आहे.जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी 11 महिन्यांपासूनची लसीची प्रतीक्षा नव्या वर्षात संपली. 16 जानेवारी रोजी राज्यभर एकाचवेळी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर आता जिल्ह्यात दररोज पाचशे कर्मचार्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान आता आणखी लसीकरणाचे आणखी चार केंद्र वाढवण्यात आले असून दररोज प्रत्येक केंद्रावर 100 याप्रमाणे 900 जणांना लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. या पोर्टलवर नोंद होणार्या कर्मचारी संख्येनुसार लसीकरणाचे नियोजन करण्यात येईल.कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत महसूल विभागाचेही महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. त्यामुळे महसूल कर्मचार्यांचा फ्रंटलाईन वर्करर्स या प्राधान्य गटात समावेश करण्यात आला असून लसीकरणासाठी माहिती संकलित करण्याचे काम सध्या सुरु आहे. यासाठी कोविन पोर्टलवर कर्मचार्यांची माहिती अपलोड करायची आहे.जे अधिकारी व कर्मचारी कोविड संसर्ग रोखण्यासाठीच्या कंटेनमेंट,सर्व्हेलन्स व इतर बाबींमध्ये काम करत होते, त्यांची माहिती या पोर्टलवर विहित नमुन्यात भरावयाची आहे.
टप्प्याटप्याने होणार लसीकरण
राज्याच्या आरोग्य सेवा संचालकांच्या आदेशावरुन जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांची माहिती कोविन पोर्टलवर अपलोड केली जात असून 25 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंतची मुदत यासाठी दिलेली आहे. माहिती अपलोड करणार्या कर्मचार्यांना टप्प्या-टप्प्याने लस टोचण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेची तयारी सुरु असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी सांगितले.
Leave a comment