बीड | वार्ताहर
कोरोना प्रतिबंधक लस विकसीत झाल्यानंतर ती आरोग्य कर्मचार्यांना दिली जात आहे. असे असले तरी जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत वाढ होवू लागल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. शनिवारी (दि.२३) जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल ५० नवे रुग्ण निष्पन्न झाले आहेत. मागील १५ दिवसातील ही सर्वात मोठी रुग्ण संख्या आहे. तसेच २९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यात शनिवारी ७४२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी ६९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ५० जणांचे अहवाल कोरोनाबाधित निष्पन्न झाले. या बाधितांमध्ये अंबाजोगाई १२, आष्टी २, बीड १६, केज ६, माजलगाव १, परळी ३ आणि शिरुर कासार तालुक्यातील १० जणांचा समावेश आहे. सुदैवाने शनिवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही तर २९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या १७ हजार ५४९ इतकी झाली असून यापैकी १६ हजार ७४४ जण कोरोनामुक्त झाले आहे तर ५५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली.
Leave a comment