परळी । वार्ताहर
परळी नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असतानाही शिवसेनेच्या एकमात्र नगरसेविकेस सभापती पद देण्यात आले. परळी नगरपरिषदेच्या विषय समित्यांची फेरनिवड शुक्रवारी संपन्न झाली. या फेरनिवडीमध्ये सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व जाती-धर्मांवर न्याय करतच महाविकास आघाडीच्या धर्माचेही पालन केल्याचे दिसून आले.
परळी नगरपरिषदेत एकूण 32 निवडून आलेले व 3 स्वीकृत असे एकूण 35 नगरसेवक आहेत. यापैकी जवळपास 30 नगरसेवक एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तर श्रीमती गंगासागर शिंदे या एकमेव शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. शुक्रवारी विषय समित्यांच्या फेरनिवडणुकीत शिवसेनेच्या एकमात्र नगरसेविका श्रीमती गंगासागर बाबुराव शिंदे यांना महिला व बालविकास सभापती पद देण्यात आले.याशिवाय अन्नपूर्णा आडेपवार यांना बांधकाम, उर्मिला गोविंद मुंडे यांना पाणीपुरवठा, शेख अन्वरलाल यांना स्वच्छता समिती, गोपाळकृष्ण आंधळे यांना शिक्षण समिती या सर्व सभापती पदांसह स्थायी समितीवर बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शहाजहान बेगम समीउल्ला खान व श्रीमती रेश्मा बळवंत यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या आहेत.यावेळी नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, न.प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी श्रीमती नम्रता चाटे यांनी या प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.दरम्यान एकीकडे आपल्यावर झालेल्या आरोपांचा सामना करत असताना धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत एकेरी वर्चस्व मिळवले. त्यापाठोपाठ आता नगर परिषद विषय समित्यांच्या निवडींमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळून व सर्व जाती धर्मांना समान न्याय देण्याची भूमिका बजावली.
Leave a comment