निवडीत नगराध्यक्षांचे वर्चस्व
बीड । वार्ताहर
नगर पालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती पदाची निवड शुक्रवारी संपन्न झाली. नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर समर्थक सर्व बीड शहर विकास आघाडीच्या सभापतींची निवड बिनविरोध झाली. सर्व नवनियुक्त सभापती यांचे यावेळी स्वागत करुन अभिनंदन करण्यात आले.
बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आणि विषय समित्यांच्या सभापती निवडीबाबत शुक्रवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. शुक्रवार दिनांक 22 रोजी दुपारी बारा वाजता बीड नगरपरिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन नामदेव टिळेकर, मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांनी काम पाहिले. सभापती निवडीत सार्वजनिक बांधकाम- विनोद रोहिदास मुळूक, महिला व बालकल्याण- अश्विनी धर्मराज गुंजाळ, पाणीपुरवठा - शेख इलियास, अर्थ व नियोजन - सुशिला नरसिंगराव नाईकवाडे, विद्युत- सुभद्राताई पिंगळे, शिक्षण व क्रिडा - भास्करराव जाधव तर स्थायी समिती सदस्यपदी ड.विकास जोगदंड, शेख मोहंमद खालेद, फारुख पटेल यांची निवड करण्यात आली. यावेळी आघाडीच्या वतीने एकही अर्ज दाखल न झाल्याने सर्व सभापतींच्या निवडी बिनविरोध घोषित करण्यात आल्या.
निवडी नंतर नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सर्व सभापतीचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर म्हणाले की येत्या काळात सर्व सभापतींनी आपापल्या जबाबदार्या पूर्ण करून शहर विकासासाठी सर्वांनी योगदान द्यावे. आगामी काळात बीड शहरातील सर्व कामे आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावा. तसेच प्रत्येक नगरसेवक यांनी आपापल्या प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक आपल्या दारी मोहीम राबवून नागरिकांच्या समस्यांचे निवारण करावे. जी कामे चालू आहेत ती पूर्ण करून आणखी येणार्या निधीतून उर्वरित विकास कामे केली जाणार आहेत. शहरवासीयांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे असेही ते म्हणाले. यावेळी नवनिर्वाचित सभापतींच्या समर्थकांनी फटाके वाजवून आंनद साजरा केला.
Leave a comment