बीड । वार्ताहर
जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी नव्याने 200 खाटांच्या इमारतीला बुधवारी (दि.20) औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे आता बीड जिल्हा रुग्णालयातून अधिकाधिक रुग्णांवर विविध प्रकारचे उपचार करणे शक्य होणार आहे. बुधवारी या संदर्भात औरंगाबाद येथे आरोग्य विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांची बैठक पार पडली. इमारतीसाठी लागणारा निधी, इमारतीचा नकाशा, अंतर्गत व्यवस्था आदींबाबत विस्ताराने चर्चा होवून निर्णय होईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी दिली.
बीड जिल्हा रुग्णालयात जिल्ह्याच्या विविध भागातून उपचारासाठी येणार्या रुग्णांची संख्या प्रचंड मोठी आहे. येथील आंतररुग्ण विभागासाठी 320 खाटांची व्यवस्था विविध वार्डमध्ये करण्यात आलेली आहे. तसेच दोन वर्षापूर्वी स्वतंत्र माता-बाल शिशू कक्षाची 100 खाटांची इमारत बांधकामाला मंजूरी मिळाली होती, त्यानंतर आता हे बांधकामही अंतिम टप्प्यात पोहचत आहे. ही 100 खाटांची इमारत 4 मजली बांधली जात आहे. यातील पहिल्या दोन मजल्यांचे संपूर्ण बांधकाम येत्या मार्चअखेरीस पूर्ण होत आहे. त्यामुळे प्रसुती कक्ष तसेच माता-बाल उपचार कक्ष या ठिकाणी कार्यान्वीत केला जाणार असून रुग्णांनाही यानिमित्ताने चांगली सुविधा नव्या इमारतीत मिळेल असा विश्वास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी व्यक्त केला.
जिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या लक्षात घेता क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात. हे चित्र नवे नाही. त्यामुळे काही वार्डांमध्ये प्रामुख्याने वार्ड क्रमाक 5 व 6 मध्ये तर रुग्णांना खाटा मिळणेही अशक्य होते,पर्यायाने त्यांच्यावर बेड शेजारी खाली बेड टाकून उपचार करण्याची वेळ येते. दुसरीकडे बाह्य रुग्ण विभागातही दररोज पाचशेहून अधिक रुग्ण उपचारासाठी येत असतात. दरम्यान आता वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेडची संख्या वाढवणे क्रमप्राप्त झालेले आहे. हाच धागा पकडून जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सातत्याने वरिष्ठांशी पत्रव्यवहार तसेच प्रस्ताव पाठवून मागणी केली जात आहे. यापूर्वी जिल्हा रुग्णालयात ‘सुपर स्पेशालिटी ट्रिटमेंट’ रुग्णांना मिळावी, त्यातून महागड्या शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेतून करता येतील यासंदर्भातील प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. तूर्तास याबाबत निर्णय झालेला नाही. असे असतानाच आता जिल्हा रुग्णालयाच्या दिमतीला आता आणखी 200 खाटांच्या इमारतीसाठी मंजुरी मिळत आहे. बुधवारी याबाबत औरंगाबाद येथे एक बैठक झाली आहे. याबाबतचा निर्णय लवकरच होणार असल्याचेही डॉ. गित्ते यांनी लोकप्रश्नशी बोलताना सांगीतले.
Leave a comment