सरपंच पतीसह दिराविरुध्द गुन्हा;तक्रारदाराचे एसपींना निवेदन
बीड । वार्ताहर
ग्रामपंचायतीची चौकशी लावतो का, अशी कुरापत काढून सरपंच पतीसह दिराने घरात घुसून मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.18) वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथे घडली. यावरुन दोघांवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद वडवणी ठाण्यात झाली.
श्रीराम बन्सी मुंडे (60, रा.चिखलबीड) असे तक्रारदाराचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, 18 रोजी रात्री साडेनऊ वाजता ते घरी होते. यावेळी सरपंच पती विलास काणिक मुंडे व दीर विकास काणिक मुंडे हे दोघे घरासमोर येऊन शिवीगाळ करु लागले. दरवाजावर लाथा मारुन त्यांनी ग्रामपंचायतची चौकशी लावतो का, अशी कुरापत काढून घरात घुसून मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यावरुन दोघांवर मंगळवारी वडवणी पोलिसांत अदखलापत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दरम्यान या प्रकरणातील आरोपींवर अदखलपात्र गुन्हा न नोंदविता एफआयआर नोंदवून गावबंदी करावी, अशी मागणी तक्रारदार श्रीराम मुंडे यांनी बुधवारी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली. त्यांच्या कृत्यामुळे कुटुंब भयभीत झाले असून जीवितास धोका असल्याचे म्हटले आहे. याबाबत वडवणी ठाण्याचे सहायक निरीक्षक नितीन मिरकर म्हणाले, तक्रारीप्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. आरोपींना पाठीशी घातलेल नाही.पोलीस अधिक तपास करत आहेत.
Leave a comment