आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचार्यांनी घेतली लस
बीड । वार्ताहर
कोरोना प्रतिबंध लस घेण्यास शनिवारपासून बीड जिल्ह्यात प्रारंभ झाला; मात्र मंगळवारी या लसीकरणाकडे आरोग्य कर्मचार्यांनीच पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले होते. त्यानंतर बुधवारी (दि.20) मात्र समाधानकारक लसीकरण झाल्याचे आरोग्य विभागाकडून आलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात 500 पैकी 357 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली.
बीड जिल्ह्यात पाच केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. यातील प्रत्येक केंद्रावर प्रतिदिन 100 जणांना लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने अगोदरच केलेले आहे. दरम्यान मंगळवारी जिल्ह्यात केवळ 142 जणांनी लस घेतल्याचे समोर आले होते.त्यानंतर बुधवारी मात्र लसीकरणाचा टक्का समाधानकारक वाढल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात दिवसभरात एकूण 357 आरोग्य अधिकारी,कर्मचार्यांनी लस घेतली. यात अंबाजोगाईतील एसआरटी रुग्णालयात 82, जिल्हा सामान्य रुग्णालयात 98, गेवराई उपजिल्हा रुग्णालयात 51, आष्टी ग्रामीण रुग्णालयात 55 तर परळी उपजिल्हा रुग्णालयात 71 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. दिवसभराच्या उद्दिष्टाच्या तुलनेत 71.4 टक्के लसीकरण जिल्ह्यात यशस्वी झाले.
Leave a comment