उस्मानाबाद | वार्ताहर
कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत होता. आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली
आरोग्य विभागातील 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे. उद्या (18 जानेवारी) नोकर भरतीची जाहिरात निघेल. 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं
कोरोना संकट काळात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नोकरीचे कंत्राट संपले असले तरी त्यांना आगामी काळात आणि इतर नोकर भरती वेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी नोकर भरती प्रक्रियेत बदल करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोना काळात कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या आरोग्य कर्मचारी यांना कोरोना संकट कमी झाल्याने नोकरीतून काढून टाकले होते. त्यामुळे या लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. मात्र या कर्मचाऱ्यांना नोकर भरतीत प्राधान्य दिले जाणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परिक्षा आणि त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
जिंजर नावाची एक आयटी कंपनी ही परीक्षा घेणार आहे. महाआयटी कंपनीनं ही कंपनी निवडली आहे. ओएमआर शीट या परीक्षेसाठी असणार आहे. सर्व बाबी पडताळून या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
टोपे म्हणाले की, आधी एसईबीसी ग्रहित धरुन आपण अर्ज मागवले होते. आता एसईबीसी रद्द झाल्यानं ते ओपनमध्ये गेले. मग पुन्हा त्याचं रोस्टर बनवण्याची आवश्यकता होती. पूर्ण मागासवर्गीय कक्षांमध्ये याबाबत पूर्ण होमवर्क करावा लागला. प्रत्येक संवर्गाचा आम्ही रोस्टर फिक्स केले आणि आता परीक्षा आता आम्ही व्यवस्थित घेत आहोत, असं त्यांनी सांगितलं.
कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्यांचं काय?
कोरोना काळात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं नोकरीचं कंत्राट संपलं असलं तरी त्यांना आगामी काळात आणि इतर नोकर भरतीवेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार असल्याचं राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे.
दोन टप्प्यात नोकर भरती
आरोग्य विभागात एकूण १७ हजार पदांची भरती करण्यात येणार असून यात पहिल्या टप्प्यात ८ हजार ५०० पदांची भरती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील भरती ही ग्रामविकास विभागाशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आहे. या भरतीत क आणि ड वर्गातील पदं भरली जाणार आहेत. यात नर्सेस, वॉर्ड बॉय, क्लर्क आणि टेक्निशियनचा समावेश असणार आहे.
महाराष्ट्रात सर्वांना लसीकरणाची गरज नाही
या मुलाखतीत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, महाराष्ट्रात काल 65 टक्के लसीकरण झाले. केवळ 9 किरकोळ केसेस आढळून आल्या, ज्यांना थोडा त्रास झाला, असं ते म्हणाले. ते म्हणाले. की, महाराष्ट्रात सर्वांना लसीकरणाची गरज नाही. 30 वर्षापेक्षा कमी वयं असलेले आणि ज्यांना आजार नाही त्यांचे लसीकरण करू नये, असंही टोपे म्हणाले.
केंद्राने राज्याशी दुजाभाव केला नाही
राजेश टोपे म्हणाले की, कोरोना काळात केंद्राने राज्याला पूर्ण सहकार्य केलं आहे. केंद्राच्या कोविड मॅनेजमेंट आणि लसीकरणाच्या मॅनेजमेंटमधले काम चांगले आहे. केंद्राने राज्याशी दुजाभाव केला नाही, असं ते म्हणाले. आजच्या गतीने महाराष्ट्रात तीन महिन्यात लसीकरण पूर्ण होवू शकते, असं त्यांनी सांगितलं. गरज पडली तर महाराष्ट्रात लसीकरणासाठी राज्य सरकार निधी देवू शकते, असं देखील टोपे म्हणाले. महाराष्ट्रात देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत चार पट मृत्यू आहेत असं विचारलं असता ते म्हणाले की, इतर राज्यांनी मृत्यू लपवले असू शकतात.
टोपे म्हणाले की, आज देण्यात आलेल्या भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि सीरमच्या कोव्हिशील्ड या दोन्ही लशी सुरक्षित आहेत. लसीबाबत शासन आणि वैज्ञानिकांवर विश्वास ठेवा. यात सहभाग घेऊन सकरात्मक प्रतिसाद देऊन सुरक्षित राहावे असं आवाहन त्यांनी केलं.
जर कोविड काळात राज्य पातळीवर भ्रष्टाचार झाला असेल तर तो प्रकार मढ्याचे टाळूवरचे लोणी खाण्यासारखा आहे असं देखील ते म्हणाले. जिल्हा पातळीवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून झालेल्या खरेदीत काही झाले असेल तर त्याला जिल्हाधिकारी जबाबदार असतील असंही ते म्हणाले. त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
Leave a comment