जिल्हा रुग्णालयासह पाच ठिकाणी लसीकरण सुरु
बीड | वार्ताहर
अकरा महिन्याच्या प्रतिक्षेनंतर अखेर बीड जिल्ह्यात बुधवारी कोरोना लस पोहचली. कोरोना लसीकरणाबाबत जिल्हा आरोग्य विभागाने अगोदरच ड्रायरन घेवून नियोजन पुर्ण केले होते. त्यानंतर आज शनिवारी (दि.16) जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा श्री गणेशा करण्यात आला. बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आज सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचार्यांना कोव्हीड लस टोचवण्यात आली. तत्पूर्वी लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, मेट्रन संगिता दिलकर, डॉ.संजय कदम, डॉ.राऊत, डॉ.आंधळकर, डॉ.पांगरीकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत धन्वंतरी पुजन व दिपप्रज्वलन करुन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्ह्यात आज शनिवारी जिल्हा रुग्णालय, आष्टी ग्रामीण रुग्णालय, परळी उपजिल्हा रुग्णालय, गेवराई उपजिल्हा रुग्णालय व स्वाराती रुग्णालय अंबाजोगाई या 5 केंद्रावर 500 आरोग्य कर्मचार्यांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. जिल्ह्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे 17 हजार 650 डोस उपलब्ध झाले आहेत. यातील 14 हजार 608 आरोग्य कर्मचार्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. एका बुथवर दररोज 100 कर्मचार्यांना लस दिली जाणार आहे.
डॉ.पांगरीकर ठरले पहिले मानकरी
कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु झाल्यानंतर जिल्ह्याती पहिल्या लसीचा मान इंडियन मेडीकल असोसिएशनचे बीड शाखेचे अध्यक्ष डॉ.अनुराग पांगरीकर यांना मिळाला. यावेळी आरोग्य कर्मचार्यांना लसीकरण करण्यात आले.
Leave a comment