मुंबई / प्रतिनिधी

ऊसाचे क्षेत्र जास्तीत जास्त ठिबक सिंचनाखाली आणावे. साखर कारखान्यांनी त्यांच्या क्षेत्रातील ऊस क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याकरिता प्रोत्साहनात्मक उपक्रम हाती घ्यावे. ऊसाच्या प्रजातीची निर्मिती करताना साखरेचे प्रमाण अधिक त्याचबरोबर अल्कोहोल निर्मितीसाठी योग्य प्रजातीच्या संशोधनासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.

            राज्यातील ऊस संशोधन प्रकल्पाचा कृषी मंत्र्यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.धवन, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे (व्हीएसआय) संचालक विकास देखमुख, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे डॉ.रासकर, डॉ.शरद गडाख आदी यावेळी उपस्थित होते.

            राज्यातील चारही कृषी विद्यापीठ आणि व्हीएसआय यांनी राज्यातील ऊस ऊपादन व संशोधनाबाबत दर तीन महिन्यांनी बैठक घ्यावी. याबाबत पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने समन्वय करण्याचे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले.

            राज्यात ऊस संशोधनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठा अंतर्गत पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आणि व्हीएसआय या संस्था अग्रणी आहेत. कोकणात देखील ऊसाखालील क्षेत्र वाढण्यास संधी असून त्या संदर्भात आज झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली येथील हवामान ऊस उत्पादनासाठी अनुकुल असून त्या अनुषंगाने व्हीएसआयने तेथे ब्रिडींग सेंटर उभारले आहे. तेथे देशातील विविध वाणांची लागवड करण्यात आली असून संशोधनाचे कार्य सुरु आहे. या क्षेत्राचा वापर कृषी विद्यापीठांनी करावा. तसेच व्हीएसआयला चाचण्यांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले.

 

महाराष्ट्रात अव्होकाडो फळ लागवडीस चालना

कृषीमंत्री दादाजी भुसे

         महाराष्ट्रात अव्होकाडो (लोणी फळ) फळाच्या लागवडीला चालना देण्यात येत असून दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात या संदर्भात प्रायोगिक तत्त्वावर लागवडीचा प्रयोग केला जाणार आहे. जगाच्या पाठीवर कृषी क्षेत्रात जे संशोधन आहे त्याचाच भाग म्हणून या लागवडीकडे पाहिले जात आहे. कोकणात या फळाची लागवड यशस्वी झाल्यास मोठी क्रांती ठरेल, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे सांगितले.

            मंत्रालयात या संदर्भात आज बैठक झाली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत आदी यावेळी उपस्थित होते. न्युट्रीफार्म ॲग्रीकल्चर कंपनीमार्फत या संदर्भात सादरीकरण करण्यात आले.

            मुळचे अमेरिकेचे फळ असून त्याला बाजारात मोठी मागणी आहे. भारतीय ग्राहकांमध्ये अद्याप त्याचा प्रसार कमी असून आरोग्याच्या दृष्टीने या फळाचा आहारात समावेश केल्यास फायदा होतो. या फळात ऊर्जा मोठ्या प्रमाणात असून रक्तातील साखर वाढू न देता ऊर्जा देण्याचे काम केले जाते. त्याचबरोबर या फळात प्रथिने जास्त आणि कर्बोदके कमी असतात त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे फळ असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अव्होकाडो फळाच्या लागवडीस चालना देणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सद्या भारतात या फळाची उलाढाल 50 कोटी रुपयांच्या आसपास असून सुधारित जातीच्या लागवडीची निर्यात केल्यास अधिक उत्‍पन्न मिळू शकते असे सादरीकरण दरम्यान सांगण्यात आले.

            मालूमा, हास, पिंकर्टन या जातीच्या फळाला जगभर मागणी आहे. कोकण कृषी विद्यापीठामध्ये मालूमा, हास या जातींची लागवड प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात यावर्षी 8 ते 10 शेतकऱ्यांकडे या फळाची लागवड प्रस्तावीत असून जांभळा आणि पिवळसर राखाडी रंगाच्या स्थानिक जाती आहेत.

            यावेळी कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी जगाच्या पाठीवर जे काही उत्कृष्ट संशोधन आहे त्याचा वापर केला पाहिजे. कोकणतील हवामान या फळाला पोषक असून त्याची लागवड यशस्वी झाल्यास कृषी क्षेत्रात क्रांती ठरेल असेही त्यांनी सांगितले. फळांमध्ये निसर्गाने दिलेला जो जुना ठेवा आहे त्याची जपणूक करा. जांभूळ, फणस या फळांकडे पुरेसे लक्ष द्या असेही त्यांनी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.