अग्निरोधक यंत्रे मुदतबाह्य सहा वर्षापासून फायर ऑडिटही नाही!
बीड । वार्ताहर
भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. रविवारी (दि.10) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी जिल्हा रुग्णालयाच्या काकू-नाना हॉस्पिटलमधील स्थलांतरित नवजात शिशु कक्षाला (एसएनसीयू)भेट दिली. यावेळी त्यांनी सुरक्षात्मक उपायांची पाहणी केली. या कक्षाचे प्रमुख डॉ.इलियास खान यांच्याकडून त्यांनी माहिती जाणून घेतली. तेथे योग्य त्या सुविधा असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, मेट्रन संगीता दिंडकर सोबत होते. दरम्यान जिल्हा रुग्णालयातीलच अग्निरोधक यंत्रे मुदतबाह्य असून पाच वर्षांपासून ’फायर ऑडिट’ झालेले नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. खासगी हॉस्पिटलमध्येही याहून वेगळी स्थिती नाही. तेथेही अग्निसुरक्षेच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रूग्णालय या ठिकाणी फायर ऑडिट झाले आहे का, तेथे आपत्कालीन स्थिती ओढावल्यास स्प्रींकलर, स्मोक डिटेक्टर्स, फायर क्स्टींगलिशर, फायर प्रुफ वॉल्व्ह या गोष्टी आहेत का, याची माहिती मागविण्यात आली आहे. तसेच एसएनसीयू, एनआयसीयू, एसबीसीयू या ठिकाणी कार्यरत डॉक्टर, परिचारिका, ऑक्सिजन प्लांट, विजेचा पुरवठा याचीही सर्व माहिती आरोग्य संचालकांना पाठविली जाणार आहे. खासगी रूग्णालयातील शिशुगृहात अग्निरोधक उपायांकडे दुर्लक्ष असल्याचा अंदाज आहे.
त्यामुळे सर्व खासगी रुग्णालयांना पत्र पाठवून विशिष्ट प्रपत्रात माहिती मागविली जाणार आहे. त्रुटींची पूर्तता करण्यासाठी वेळ देऊन नंतर उलट तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच समिती गठीत केली जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी सांगितले. मात्र, असले तरी अद्याप आरोग्य विभागाकडे जिल्ह्यात किती खासगी रूग्णालयांमध्ये एसएनसीयू आहेत, याचीच माहिती नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. महत्वाचे हे की, यापूर्वी 2015 साली जिल्हा रूग्णालयाचे ’फायर ऑडिट’ करण्यात आले होते. मात्र,त्यानंतर एकदाही ऑडिट करण्यात आलेले नाही. दरम्यान, गतवर्षी जिल्हा रुग्णालयातील रेकॉर्ड रुमला आग लागली होती. यात जिल्हा रुग्णालयाचे महत्त्वाचे दस्ताऐवज जळून खाक झाले होते, शिवाय फर्निचरही भक्ष्यस्थानी सापडले होते. मात्र, यातूनही जिल्हा रुग्णालय प्रशासनाने योग्य तो धडा घेतलेला दिसत नाही.
Leave a comment