शहरी भागातील नोंदणीकृत रुग्णालयांची
आकडेवारीच जिल्हा रुग्णालयाला देता येईना
बीड । वार्ताहर
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू कक्षाला लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे.भंडारा येथील या घटनेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील खासगी आणि शासकीय रुग्णालयाची अवस्था कशी आहे याचा आढावा घेतला असता स्थलांतरित झालेल्या जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु कक्षामध्ये अग्निरोधक सर्व यंत्रणा कार्यान्वित असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. असे असले तरी शहरी भागातील खासगी रुग्णालयांची नोंदणी जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत होत असते. मात्र शहरी भागातील नोंदणी झालेल्या रुग्णालयाची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाला देताच आली नाही हे विशेष. तसेच जिल्ह्यातील काही मोजके खासगी रुग्णालये वगळता इतर रुग्णालयातील फारसी अग्निरोधक सुरक्षा कागदावरच असल्याचे दिसून येते.
भंडार्यातील घटनेनंतर बीड जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. आरोग्य विभागाने शनिवारी सायंकाळी तातडीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आरोग्य विभागाची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना जारी केल्या असल्या तरी खासगी रुग्णालयांना फायर ऑडीट करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, त्यामुळे हे रुग्णालये अग्निरोधक सुविधांकडे लक्ष कधी देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. बीड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात ठिकठिकाणी खासगी रुग्णालये आहेत. यातीत सर्वच रुग्णालयांची नोंदणी बीड एनआयसीच्या पोर्टलवर झालेली दिसत नाही.
एनआयसीच्या पोर्टलवरी माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील एकुण रुग्णालयांची संख्या 383 इतकी दाखवली गेली आहे. यात बीड तालुक्यात 135, परळी 47, अंबाजोगाई 42, शिरुरकासार तालुक्यात केवळ 3, वडवणी 10, धारुर 22, केज 12, पाटोदा 13, माजलगाव 54, गेवराई 40 व आष्टी तालुक्यात 5 खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. वास्तविक यापेक्षा अधिकचे रुग्णालये जिल्ह्यात सुरु आहेत. यातील शहरातील रुग्णालयांची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडेही उपलब्ध नाही, नंतर माहिती सांगू असे उत्तर संबंधित विभागातील कर्मचार्याकडून दिले जाते. तर ग्रामीण भागातील 128 खासगी रुग्णालयांची नोंदणी जिल्हा आरोग्य विभागाकडे झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. संबंधित रुग्णालयांना परवानगी देताना बॉम्बे नर्सिंग अॅक्टच्या नियम व अटींचे पालन करण्याचे सांगीतले जाते. शिवाय ग्रामीण भागात बोगस काम करणार्या रुग्णालयावर कारवायाही झाल्या आहेत.
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये सर्व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध असल्याचे डॉक्टरांकडून तोंडी सांगितले जात आहे; मात्र भंडार्याच्या घटनेनंतर आता सर्व रुग्णालयांच्या सुरक्षिततेचे ऑडिट करावे लागणार आहे. हाच धागा पकडून बीड जिल्ह्यातील रुग्णालयांची संख्या आणि या ठिकाणच्या रुग्णालय प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने केल्या गेलेल्या उपाययोजनांची माहिती मागवली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत बीड अग्निशमन दलाला विचारणा केली असता शहरातील केवळ दोन ते तीन खासगी रुग्णालयांनी नाहरकत प्रमाणपत्र घेतले असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील रुग्णालयांच्या सुरक्षेचा मुद्दा यामुळे ऐरणीवर आला अहे.
जिल्हा रुग्णालंयासह सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडीट करा
भंडार्याच्या घटनेनंतर राज्य आरोग्य संचालकांचे व्हीसीव्दारे आदेश
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू कक्षाला लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. भंडारा येथील या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य संचालकांनी सर्वच जिल्हा शल्य चिकिस्कांची शनिवारी (दि.9) सायंकाळी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे आढावा बैठक घेत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडीट करावे. तसेच अग्निरोधक यंत्रणा कशी हाताळायची याबाबत संबंधितांना प्रशिक्षण द्यावे, तसेच फायर ऑडीटचा अहवाल येत्या सोमवारी (दि.11) सकाळी 11 वाजेपर्यंत त्याची सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहेत.
बीड येथून या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, नवजात शिशू कक्ष प्रमुख डॉ.इलियास खान, तसेच या कक्षाचे परिचारिका उपस्थित होत्या. राज्याच्या आरोग्य विभागाकडून अर्चना पाटील सतिश पवार, श्री व्यास यांच्यासह आरोग्य विभागाचे संचालक यांनी सर्व जिल्हा शल्य चिकित्सकांना तातडीने रुग्णालयांचे फायर ऑडीट करण्याचे निर्देश दिले. या बैठकीतून रुग्णालयांनी यापूर्वी केलेले फायर ऑडीटची माहिती द्यावी. प्रत्येक आठवड्यात जिल्हा शल्य चिकित्सकांनी तसेच अतिरिक्त शल्य चिकित्सकांनी जिल्हा रुग्णालयासह अतिदक्षता कक्षाची तपासणी करावी. तेथील त्रुटी जाणून घेत त्याची माहिती सादर करावी.
याबरोबरच अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वीत करताना स्प्रिंकलर, स्मोक डिटेक्टर, फायर एक्सिमेशन, फायर प्रुफ वॉल्सची स्थिती कशी आहे याचा आढावा वेळोवळी घ्यावा असे निर्देशही आरोग्य संचाकांनी या बैठकीतून दिले. याबरोबरच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, व इतर शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडीट करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्हा आरोग्य अधिकार्यांशी संपर्क करुन आपला अहवाल सोमवारीच प्रोफार्मामध्ये सबमिट करुन पाठवण्याचे सांगण्यात आले. महत्वाचे हे की, बीड जिल्हा रुग्णालयात यापूर्वी 2015-16 मध्ये फायर ऑडीट करण्यात आले होते. त्यानंतर कोणी लक्ष दिले नाही, आता पुन्हा भंडार्याच्या दुर्देवी घटनेनंतर रुग्णालय सुरक्षेचा मुद्दा समोर आल्यानंतर पुन्हा ऑडीट होत आहे.
Leave a comment