लोकनेते मुंडे साहेबांच्या अस्तित्वाचाच जणू झाला भास
परळी । वार्ताहर
अठरा महिन्याच्या गॅपनंतर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना यावर्षी पुन्हा एकदा तितक्याच ताकदीने सुरू झाला आहे. गेल्या 19 दिवसात उत्पादित झालेली साखर पाहून कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांचा आनंद त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट जाणवत होता. ’वैद्यनाथ’ च्या यंत्राची धडधड म्हणजे जणू लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या अस्तित्वाचाच भास त्यांना यावेळी जाणवला.
मध्यंतरीच्या दुष्काळामुळे वैद्यनाथ कारखाना गेली अठरा महिने बंद होता. नैसर्गिक संकट आणि आर्थिक विवंचनेत कारखाना सुरू करणे तशी तारेवरची कसरत होती परंतू पंकजाताई मुंडे यांनी आलेल्या सर्व संकटावर मात करत कारखाना पुर्ववत सुरू करण्यात यश मिळवले. गेल्या 19 दिवसांत कारखान्याने ऊस उत्पादक शेतकर्यांचा 62 हजार मेट्रिक टन ऊस गाळप केला असून 48 हजार साखर पोत्याचे उत्पादन केले आहे. दररोज 3 हजार 500 मेट्रिक टन ऊस गाळप करत असलेला वैद्यनाथ येत्या दोनच दिवसांत 4 हजार मेट्रिक टन क्षमतेने ऊस गाळप करणार आहे, तसे नियोजनच कारखान्याने केले आहे.
पंकजाताई मुंडे शुक्रवारी दिवसभर वैद्यनाथ साखर कारखान्यावर होत्या. वैद्यनाथ व पानगांव कारखान्याच्या गळीत हंगामाचा आढावा त्यांनी अधिका-यांच्या बैठकीत घेतला. त्यानंतर कारखान्यात जाऊन यंत्रणेची पाहणी केली. कारखान्याने उत्पादित केलेली तीन प्रकारची साखर पाहून त्या आनंदल्या.एवढेच नव्हे तर ती साखर उपस्थित अधिकारी, कर्मचारी व संचालकांना वाटप करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. वैद्यनाथ हा लोकनेते मुंडे साहेबांचा जीव की प्राण होता, अगदी तीच आठवण पंकजाताई मुंडे कारखान्याची पाहणी करताना उपस्थितांना आली.
Leave a comment