मुंबईतील दादर व चेंबूरमधून रक्कम लांबवल्याचे उघड
बीड । वार्ताहर
भामट्यांनी चक्क बनावट एटीएम कार्ड तयार करून एका शिक्षकाच्या स्टेट बँक ऑफ इंडिया येथील पगार खात्यातून तब्बल 80 हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार बीडमध्ये नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अभिमान भीमराव पायाळ (रा. पंचशीलनगर, बीड) हे बीड तालुक्यातील कुर्ला येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे बीडच्या एसबीआयमध्ये पगार खाते आहे. मागील शुक्रवारी (दि.25) सकाळी त्यांनी एटीएम कार्डद्वारे खात्यातून 11 हजार रुपये काढले. त्यानंतर दि.28 ते 31 दरम्यान वेळोवेळी एटीएम कार्ड वापरून त्यांच्या खात्यातून एकूण 80 हजारांची रक्कम काढून घेतल्याचे एसएमएस त्यांच्या मोबाईलवर आहे. त्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता मुंबईतील दादर आणि चेंबूर येथील एटीएम मधून सदरील रक्कम काढण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. परंतु, एटीएम कार्ड बीडमध्ये स्वतःजवळ असताना मुंबईच्या एटीएम मधून रक्कम काढल्याने भामट्यांनी बनावट एटीएम कार्ड तयार करून सदरील व्यवहार झाल्याची त्यांना खात्री पटली. याप्रकरणी अभिमान पायाळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्यावर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरिक्षक ठोंबरे करत आहेत.
Leave a comment