सुदैवाने आग विझवण्यात यश,तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान
आष्टी / प्रतिनिधी
तालुक्यातील कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कापसाने खचाखच भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याची थरारक घटना बुधवारी ( दि. ३० ) दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली. ट्रकवरील विद्युत वाहिनीत स्पार्किंग झाल्याने ही आग लागली. आगीमुळे ट्रकमधील कापसाने क्षणार्धात पेट घेतला. प्रसंगावधान राखून नागरिकांनी वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.
कडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शैलेश कुमार गांधी यांचे आडत दुकान आहे. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास येथे ट्रकमध्ये कापूस भरण्याचे काम सुरु होते. मजूर कापूस भरत असताना ट्रकवरील विद्युत वाहिनीत अचानक स्पार्किंग झाली. यामुळे ट्रकमधील कापसाने पेट घेतला. क्षणार्धात आगीने मोठे स्वरूप घेतले. मात्र नागरिकांनी प्रसंगवधान राखून पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. वेळीच आग विझल्याने पुढील अनर्थ टळला. तरीही यात तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे गांधी यांनी सांगितले..
आष्टी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून कडा शहराकडे पाहिले जाते परंतु कडा या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अग्निशामक दलाची गाडी आणण्याची मागणी होत आहे अनेक वेळा छोट्या-मोठ्या आग लागण्याच्या घटना घडून प्रचंड नुकसान झाले आहे त्यासाठी कडा ग्रामपंचायतीने अग्निशामक दलाची गाडी आणावी अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे
Leave a comment