जिल्ह्यात 350 रुग्णांवर उपचार सुरु
बीड । वार्ताहर
कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण वाढतेच आहे. जिल्ह्यात रविवारी (दि.20) आणखी 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आयसीएमआरकडून बीडच्या आरोग्य विभागाच्या पोर्टलवर याची नोंद करण्यात आली आहे. तसेच 44 नवे रुग्ण निष्पन्न झाले तर 45 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 16 हजार 426 इतकी झाला असून 15 हजार 551 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे तर 525 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यात 350 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
बीड जिल्ह्यात रविवारी 592 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 44 जणांचे अवाहल पॉझिटिव्ह आले तर, 548 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. नव्या रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील 5, आष्टी 4, बीड 24,धारुर 3, गेवराई, परळी प्रत्येकी आणि शिरुरकासार तालुक्यातील 2 रुग्णाचा समावेश आहे.दरम्यान, रविवारी जिल्ह्यात 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आयसीएमआरकडून बीडच्या आरोग्य विभागाच्या पोर्टलवर याची नोंद करण्यात आली. यामध्ये खांडवी (ता.गेवराई) येथील 70 वर्षीय पुरुष व नागापूर (ता.बीड) येथील 62 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच 45 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.
एक लाख 73 हजार 852 व्यक्तींची तपासणी
बीड जिल्ह्यात रविवारपर्यंत 1 लाख 73 हजार 852 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. पैकी 1 लाख 57 हजार 426 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर 16 हजार 426 जणांचा अहवाल बाधित आला आहे. जिल्ह्यात कोरोना मृत्यदर 3.19 टक्क्यांवर पोहचले आहे.
शनिवारी जिल्ह्यात सिरो सर्वेक्षण
कोरोना विषाणूवर मात करणार्या अँटिबॉडी नैसर्गिकरित्या नागरिकांमध्ये तयार होत आहेत का? यासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडून (आयसीएमआर) संशोधन सुरु आहे. याचसाठी यापूर्वी बीड जिल्ह्यात दोनवेळेस ‘सिरो सर्वेक्षण’ करण्यात आलेले आहे. यासाठी ठराविक भागातील नागरिकांचे रक्तनमुने तपासणीला घेतले जातात. त्यातून किती जणांमध्ये अॅटिबॉडी तयार झाल्या याचा तपशील मिळवला जातो. आता 23 ते 29 डिसेंबर दरम्यान बीडसह राज्यातील परभणी,नांदेड, सांगली, अहमदनगर, जळगाव या सहा जिल्ह्यात हे सर्वेक्षण होणार आहे. 26 डिसेंबरला बीड जिल्ह्यात ‘सिरो सर्वे’ होईल. प्रत्येक जिल्ह्यात 10 ठिकाणी रक्तनमुने संकलित केले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment