परिसर हादरला; रस्त्याला भेगा; रुग्णालयाची तावदाने फुटली

 

बीड । वार्ताहर

 

शहरातील जिजामाता चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या चंपावती हार्डवेअरच्या गोदामात केमिकल मोठा स्फोट होवून एका व्यक्तीचा गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाला तर अन्य एक रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे. आज शुक्रवारी (दि.18) सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या स्फोटाची तिव्रता इतकी मोठी होती की, परिसर हादरला. एक किलोमीटर दुरपर्यंत स्फोटाचा आवाज नागरिकांनी ऐकला. दरम्यान घटनास्थळालगतच्या खासगी रुग्णालय इमारतीची काचेची तावदाने तुटून पडली. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

 

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार,अनिरुद्र सर्जेराव पांचाळ (30, रा.सेलू, ता.गेवराई ह.मु.लक्ष्मणनगर बीड) असे मयताचे नाव असून सुनील नामक अ‍ॅपे रिक्षा चालक या स्फोटात गंभीर जखमी झाला आहे. शहरातील जिजामाता चौक परिसरात व्यापारी नितीन भानुदास लोढा यांचे प्लायवुडचे गोदाम आहे. या ठिकाणी प्लायवुडसह फेविकॉल तसेच इतर काही केमिकलचे कॅन ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी या ठिकाणी काम करणारे अनिरुद्र पांचाळ हे तिथे आलेले असतांना अचानक स्फोट झाला. यात गंभीररित्या जखमी झाल्याने पांचाळ यांचा जागीच मृत्यू झाला तर अ‍ॅपेरिक्षामध्ये क्र.(एम.एच.23-7166) असलेल्या सुनील नामक व्यक्तीचा गंभीर मार लागला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, अ‍ॅपेरिक्षासह गोदामासमोर  उभ्या असलेल्या दुचाकीचे क्र. (एम.एच.23 बी.ए.4850) मोठे नुकसान झाले. दरम्यान  केमिकलमध्ये गॅस होवून नंतर त्याचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या स्फोटाची कारणे शोधण्यासाठी घटनास्थळी पोलीसांनी पंचनामा केला.

 

केमिकलसह घटनास्थळावर उडून पडलेल्या साहित्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेत  पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी बीड शहर ठाण्याचे पो.नि.रवि सानप यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच बीडीडीएसचे पथक, आयबाईक, दहशतवाद विरोधी पथक व श्वानपथकाने पाचारण केले. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. पोलीस अधिक तपास करीत आहेत. मयत अनिरुद्र पांचाळ हे मागील तीन वर्षांपासून या गोदामात काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.  घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयताच्या नातेवाईकांना अश्रु अनावर झाले होते.
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.