एखाद्या अथांग समुद्राकडे पाहिल्यावर समुद्र किती शांत आहे असा भास प्रत्येकालाच होतो. एखाद्या वाहनातून मार्गावरुन जावे आणि समुद्राकडे एक टक नजर लावावी तेंव्हा समुद्रातील शांतता प्रत्येकालाच भावते. परंतू समुद्राच्या पोटात लाटा तयार होण्यापूर्वीची जी प्रचंड कोलाहल सुरु असते ती आपल्याला जाणवत नाही. एकदा लाटा सुरु झाल्या की खवळलेल्या समुद्राचा अवतार आपण पाहतो. समुद्राच्या आयुष्यात भरती आणि ओहोटीही कायम ठरलेली आहे. तसंच काही जयदत्त क्षीरसागरांच्या बाबतीत मी अनुभवलं आहे. वरुन शांत दिसत असले, चेहर्यावर सातत्य पुर्व हास्य दिसत असले, आलेल्या प्रत्येकाचे स्वागत मान डोलावुन सहज नमस्कार म्हणून करत असले तरी पोटात प्रचंड कोलाहल सुरु असते. मनामध्ये विचारांचे जाळे सातत्याने विनण्याचे काम सुरु असते. त्यांच्या मनातील आणि पोटातील कोलाहल ते कधी चेहर्यावर, कधी बोलण्यातून, कधी वागण्यातून बाहेर येवू देत नाहीत. मग ती कोलाहल कुठल्याही स्वरुपाची असो, राजकीय असो, समाजिक असो व्यवसायीक असो की कौटूंबीक.जयदत्तअण्णा कधीही चेहर्यावर कुठलाही भाव उमटू देत नाहीत. हे त्यांना निसर्गदत्त लाभलेेले वरदान म्हणावे लागेल. आपल्या आईच्या पोटातच हा गुण घेतला की काय? असाही विचार माझ्या सारखा माणुस कधी-कधी करतो. काकू स्पष्ट वक्त्या होत्या. वेळेवर त्या चिढायच्या आणि लगेच मायाही करायच्या. अण्णा चिढलेले कधी पाहीले नाही आणि मायेने कधी कोणाला जवळ घेतले हे ही कधी दिसतले नाही. त्यांच्या वागण्यातील टिपिकलपणा अन् तेवढाच तो प्रामाणिकपणा मी सातत्याने अनुभवला आहे. औपचारीक वागणं हा त्यांचा स्थायीभाव आहे. भेटल्यावर प्रत्येकाची चौकशी करुन जुन्या आठवणी काढणे आणि समोरच्यांना प्रभावीत करणे हा देखील हातखंडा मी त्यांचा अनुभवला आहे.
जयदत्तअण्णा अत्यंत अभ्यासू आहेत. कुठल्याही विषयावर ते तेवढ्याच अभ्यासूपणे बोलू शकतात. ते संघटक आहेत. त्यांच्यामध्ये नसानसात नेतृत्व भरलेलं आहे. ते लोकप्रिय तेवढेच आहेत आणि त्याही पेक्षा महत्वाचं केवळ मतदार संघच नव्हे, जिल्हा नव्हे तर राज्यात आणि देशात त्यांच्या विश्वासार्ह्य तेबद्दल कुणीही बिनधास्तपणे बोलतात अर्थात लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांच्या बद्दल लोक राजकीय दृष्ट्या वाईट बोलतील परंतू व्यक्तीक त्यांच्याबद्दल विरोधकही कधीच वाईट बोलत नाहीत. स्वत:हाला मेन्टेन करणे हा देखील त्यांचा स्वभाव आहे. हे ते जाणीवपुर्वक करतात असे नाही. ती त्यांना सवय लागली आहे. अर्थात मुंबईमधील वास्तव्यामुळे हे त्यांच्या स्वभावात आले असेल परंतू ते तेवढेच मायाळू देखील आहेत. आणि मदत करण्याचा त्यांचा स्वभाव सर्वांनाच परिचित आहेत. त्यामुळेच अगदी औतावर काम करणारा मजुर देखील त्यांना सहजपणे भेटू शकतो बोलू शकतो.
तसे पाहिले तर 1997 पासून मी त्यांना जवळून ओळखतो त्यावेळी बदामराव पंडित युतीमध्ये आमदार होते. नंतर राज्यमंत्रीही झाले. बदामरावांच्या एकंदरीत राजकारणामध्ये जयदत्त अण्णाचा मोठा सहभाग राहिलेला आहे. राजकीय संपर्कातून मी त्यांना वयक्तीक पातळीवर चांगले अनुभवले आहे. राजकारणातील डावपेच सहजपणे फेकायचे आणि ते यशस्वी करायचे हे त्यांना लिलया जमले आहे. अपवाद स्वत:च्या बाबतीत ते हे डावपेच अयशस्वी का? होतात हे मात्र मला कालच्या विधानसभेनंतरही कळाले नाही. निवडणूक असो किंवा एखादा कार्यक्रम असो ते कोणावरही सहजपणे विसंबुन राहत नाहीत अथवा पुर्ण विश्वास टाकीत नाहीत. दहा जणांकडून फिडबॅक घेतात आणि मग विश्वास टाकतात हा त्यांचा गुणधर्म आहे. बदामराव पंडीत आणि जयदत्त अण्णा यांच्या सक्रीय राजकाणरामध्ये अनेक गोष्टीचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले आहेत. जयदत्त अण्णा सहजपणे कोणावर विश्वास टाकीत नाहीत. याचा देखील अनुभव मी अनेकवेळा घेतला आहेे. राज्याच्या राजकारणामध्ये आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. ते केवळ त्यांच्या स्वभावामुळे राजकीय विरोधक त्यांच्यावर टिका करतील मात्र वैयक्तिक पातळीवर हा माणुस किती चांगला आहे हे देखील सांगतील. उपमंत्री असतील त्यानंतर ऊर्जा मंत्री असतील, उद्योग मंत्री असतील आणि बांधकाम उपक्रम मंत्री हा त्यांचा मंत्रालयातील कार्यकाळ मी अत्यंत जवळून पाहिला आहे. मंत्रीमंडळातील जवळपास सर्वच मंत्र्यांनजवळ अण्णांबद्दल अतिशय आदर मला जाणवला. मग ते स्वर्गीय आर.आर.पाटील असतील, विद्यमान जलसंपदामंत्री जयंत पाटील असतील, मंत्री दिलीप वळसे पाटील असतील, हर्षवर्धन पाटील, तत्कालीन विरोधी पक्ष नेते, जिल्ह्याचे नेते स्व.गोपीनाथ मुंडे, अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचा अत्यंत सुसमन्वय होता. शरद पवारांचा देखील अण्णांवर विश्वास असल्याचे अनेक वेळा मला जाणवले आजही तो असेल. ते राजकीयदृष्ट्या परस्परांच्या दुर असले तरी मनकंपनाने ते दोघेही एकाच रेखाशांवर असतील असे म्हटले तर अतीशौक्ती ठरू नये. अण्णांच्या राजकारणाचा आलेख मांडायचा ठरला तो पुर्णपणे मांडणे अवघड आहेे. काँग्रेसी विचारात वाढलेल्या कुटूंबामध्ये जयदत्त क्षीरसागरांनी राजकारणाचे धडे स्व.काकुंकडून सहजपणे शिकून घेतले. काकुंबद्दल ते अत्यंत हळवे आहेत. ते साहजिकच आहे. प्रत्येकाची आपल्या आईबद्दलची जी भावना असते तीच भावना त्यांची आहे. कदाचीत त्याहीपेक्षा जास्त हळवे ते होतात हे देखील मी पाहिले आहे. राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. राजकारणाच्या यशस्वी शिखरावर ते पोहचू शकले नाहीत परंतू ते राजकीय पटलावर नक्कीच यशस्वी झालेले आहेत. मधल्या काळात बरेच काही पाणी पुलाखालुन वाहून गेले.कौटुंबीक आणि राजकीयदृष्ट्या त्यांनी विनलेले घरटे उध्वस्त झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांना बाहेर पडावे लागले आणि त्यांच्या घरालाही कौटूंबिक वादळाचा तडाखा बसला हे वादळ आहे. हे शांत होणार असा विश्वास अण्णा अनेकवेळा व्यक्त करायचे. परंतू झाले वेगळेच. पुतण्या संदीपने काकाच्या विरोधात दंड थोपटले आणि तेथून पुन्हा कौटुंबिक कलहामध्ये जयदत्तअण्णा बुडून गेले. या सर्व घटनांमध्ये मी असेल जगदीश काळे असतील, विलास बापु बडगे असतील, दिनकरराव कदम असतील त्यांचे स्विय सहाय्यक गिरीष देशपांडे असतील या सर्वांनी हा प्रसंग, ती वेळ अगदी जवळून पाहिली आहेे. पहाडासारखा माणूस कसा कोलमडतो याचा अनुभव घेतला आहे. या कुटूंब कलहामध्ये त्यांचा विश्वास फोल ठरला आणि नंतर निवडणुकांच्या राजकारणात काय झाले हे सर्वांनाच माहित आहे. राजकारणामध्ये जय पराजय हा असतोच. निवडणूकीमध्ये पराभूत होणं हे काय वाईट नाही परंतू विजय महत्वाचा असतो. आयुष्याच्या उतरत्या टप्प्यावर जयदत्त अण्णा आहेत. ते आज 70 वर्षाचे होवून जातील आयुष्याची सात दशके किती संघर्षात गेली. याचा आलेख त्यांच्या डोळ्यासमोर येईल. पहिल्या तीन दशकातील काकुंचा संघर्ष आणि त्यानंतर कुटूंबाचा राजकीय संघर्ष आणि त्या नंतर स्वत:चा राजकीय संघर्ष अशा विभागात अण्णांचे राजकारण वळसा घेतघेत पुढे आले आहेत. विद्यमान परिस्थितीमध्ये ते हिंदुत्ववादी विचारधारा असलेल्या शिवसेनेच्या भगव्या कुटूंबात सहभागी झाले. अण्णांनी शिवबंधन बांधले त्यावेळी पुण्या मुंबईच्या आणि राज्यातील अनेक पत्रकारांनी मला विचारणा केली हे कसे घडले. अण्णा शिवसेनेत कसे गेले.
नव्या प्रवाहात राजकीय भुमिका घेणे गरजेचे होतेे. त्यामुळे त्यांना ही भूमिका घ्यावी लागली.राजकारणात ते कुठेही असो कोणत्याही पक्षात असो कुठल्याही स्थानावर असो अण्णांनी आपली विश्वासर्ह्यता कायम ठेवली आहे. मंत्री म्हणून जिल्ह्याचा कारभार करतांना देखील त्यांनी या विश्वासर्ह्यतेला तडा जावू दिला नाही. त्यांच्या नंतरच्या राजकीय पिढीतील कुठल्याही नेत्याची एवढी विश्वासर्ह्यता नक्कीच नाही.जिल्ह्यात प्रत्यके गावामध्ये एक तरी अण्णांचा कार्यकर्ता आहे. ज्यावेळी एखाद्या गावात अचानक जाण्याचा प्रसंग येतो. त्यावेळी अण्णांच्या स्वभावाबद्दल, काम करण्याच्या पद्धतीबद्दल त्यांच्यामध्ये विकासाच्या असलेल्या दुरदृष्टीपणाबद्दल लोक तेवढ्याच विश्वासाने आणि आत्मीयतेने भावना व्यक्त करतात. एक राजकारणी, एक संस्था चालक आणि एक मंत्री म्हणून त्यांनी आपली प्रतिमा नेहमीच जपली आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्यातील प्रतिभेचा ठसा त्यांनी नेहमीच उमटवलेला आहे. उद्योगमंत्री असतांना त्यांनी केलेले काम आजही औरंगाबाद-जालन्याचे उद्योजक मोठ्या अभिमानाने सांगतात, बांधकाम उपक्रम मंत्री म्हणून काम करतांना त्यांनी आपल्यातील प्रगल्भतेचे दर्शन घडवले. त्यांच्या मंत्री पदाच्या कारर्कीदीत मुबंईतील सिलींकचे उद्घाटन हे माईलस्टोन ठरणार आहे. राजकारणामध्ये यशस्वी आलेख साध्य करता आला असला तरी त्या मागे किती संघर्ष आहे. हे जवळून पाहिले आहे. त्यांना अनेक वेळा व्यक्तीद्वेशातून काहींनी विरोध केला. तो त्यांनी सहजपणे सहन केला. आरोप प्रत्यारोपाने ते कधी डगमगले नाहीत. पराभवाने कधी खचले नाहीत. अगदी वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. परंतू त्यानंतरही त्यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे न खचता पुन्हा नव्या उमेदीने आमच्या सारख्या तरुणाला लाजवतील अशा पद्धतीने काम सुरु केले. कोरोना संकटाच्या काळात मदतीचा हात गोरगरीबांना दिला. ते डगमगले, ते कोसळले ते केवळ कौटूंबीक कलाहामुळे.राजकीय पटलावर जेवढे सहन केले तेवढे त्यांनी पचवले. मात्र कौटूंबिक कलाहामुळे. ते अनेक गोष्टी सहन करु शकले नाहीत. जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठे योगदान आपले राहिले पाहिजे अशी कायम त्यांची भूमिका असते. इच्छा असुनही अनेक त्यांचे विकास प्रकल्प पुर्ण होवू शकले नाही. राजकीय विरोध झाल्याने त्यांचे काही स्वप्न अजुनही अपुर्ण आहेत. राजकारणातील हे शल्य आणि कुटूंबातील कलाहाचे शल्य असुनही त्यांनी कधीच कुठेच व्यक्त केले नाहीत. खरे तर त्यांना एखादा जवळचा व्यक्त होण्यासाठी मित्र आहे की, नाही हे देखील कोणी सांगु शकनार नाही. बीडमध्ये असतांना आम्ही काही लोक काही विषय त्यांच्याशी शेयर करतोत. त्यांना माहिती देतोत ते फक्त ऐकण्याचे काम करतात. कुठल्याही विषयावर ते कधी व्यक्त होत नाहीत. मधल्या काळामध्ये त्यांच्या कुटूंबामध्ये संघर्ष निर्माण झाला. त्यावेळी ते अस्वस्थ होते. मनाच्या जंजाळामध्ये ते गुंतुन गेले होते. त्याचा परिणाम त्यांच्या त्या परिस्थितील राजकारणावर नक्कीच झाला. त्याही काळात ते कधी व्यक्त झाले नाहीत. एखदा सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री असतांना आम्ही मंत्रालयात बसलो होतोत. त्यावेळी एक भारदस्त व्यक्ती अण्णांच्या ऑफीसमध्ये आला आणि साहेब आहेत का? अशी विचारणा केली. त्यांच्या कार्यालयातील एका कर्मचार्याने आहेत बसा? असे त्यांना सांगितल्यावर आम्ही सहजपणे त्यांची चौकशी केली असता मी जयदत्तचा मित्र आहे असे त्यांनी सांगितले. त्यावेळी मला देखील अश्चर्य वाटले की, अण्णांना देखील मित्र आहेत. मी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि आण्णांनाही तेवढ्याच मिश्कीलपणा अण्णा तुम्हालाही मित्र आहे असे विचारले. खरे तर प्रत्येकाने आपल्या वयक्तीक जीवनामध्ये व्यक्त होणे गरजेचे आहे. व्यक्त होणारा माणूस मोकळा होतो असे म्हणतात. आचार्य अत्रेंनी काही लोकांचे व्यक्ती चरित्र रेखाटतांना व्यक्त होणार्या लोकांना बोलघेवडे म्हटले आहेत. तसे बोलघेवडे अण्णांनी होवू नये परंतू निदान स्वत:चे मन मोकळे करण्यासाठी, स्वत:च्या स्वास्थ्यासाठी आरोग्य चांगले रहावे यासाठी त्यांनी व्यक्त होणे गरजेेचे आहे. त्यांची गरज जिल्ह्याला आहे म्हणून त्यांनी वारंवार व्यक्त व्हायला हवं. त्यांच्यानंतर जिल्ह्याच्या विकासाची माहिती आणि आस दुसर्या पिढीत कुणी नेता आहे असे अद्याप तरी चित्र नाही. तरुण पिढीमध्ये काहीजण विकास करतीलही परंतु विद्यमान परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील जनता केवळ अण्णांकडेच विकासाचे व्हिजन असलेला नेता म्हणून पाहतात. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची स्तुती करावी म्हणून नाही तर हे तेवढेच सत्य आहे. जिल्ह्याचा भौगोलीक नकाशा पाठ असणारा एकमेव नेता म्हणजेच जयदत्त क्षीरसागर असेल हे मी तेवढ्याच विश्वासाने सांगतो. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ते सत्तेवर असतील किंवा नसतील परंतू त्यांनी जोडलेले लोक त्यांच्याबरोबर कायम असतील हे तेवढेच खरे आहे. आगामी काळात राजकारणात काय होईल. ते कुठे असतील सत्तेवर असतील की नाही हे आज सांगणे अवघड आहे परंतू त्यांचे आरोग्य कायम अबाधित रहावे यासाठी उर्वरीत आयुष्यामध्ये त्यांनी व्यक्त व्हायला हवं? त्यांनी कायम स्वमग्न राहिले तर ते योग्य ठरणार नाहीत. जिल्ह्यातील जनतेशी त्यांचा संवाद कायम असतो.जनतेच्या भावना ते नेहमी व्यक्त करतात. तेवढ्याच आत्मीयतेने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.दुसर्याचे दु:ख वाटुन घेण्याचा त्यांचा स्वभाव अत्यंत जवळुन अनुभवला आहे. स्वत:चे दु:ख त्यांनी वाटू नये परंतू ते व्यक्त करावे. ते दुखी नक्कीच नाहीत परंतू त्यांच्यामनामध्ये असलेलं शल्य त्यांनी वेळोवेळी बाहेर फेकले पाहिजे ते व्यक्त होवून कारण त्यांची नव्या पिढीला, जिल्ह्याला गरज आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना माझ्या निरोगी आयुष्यासाठी, यशस्वी राजकारणासाठी शुभेच्छा..
दिलीप खिस्ती
संपादक दै.लोकप्रश्न
Leave a comment