------ राजन पारकर -------

 

तुम्ही लोकप्रतिनिधींना मॅनेज करू शकाल, पण लोकांना नाही... नेमका हाच संदेश दिलाय महाराष्ट्रातल्या सहा जागांवरील विधान परिषद निकालांनी. कारण सहापैकी चार जागांवर सत्ताधारी महा विकास आघाडीचे (मविआ) उमेदवार आणि एका जागेवर अपक्ष निवडून येत असताना नेमक्या एकाच जागेवर भाजपचा उमेदवार कसा काय विजयी झाला? आणि तेसुद्धा दणदणीत मतांनी. कारण सोप्पंय. भाजपने जिंकलेल्या जागेवर लोकप्रतिनिधींनी मतदान केलं तर उर्वरित पाच पाच जागांवर सर्वसामान्य जनतेने! लोकप्रतिनिधींना एक वेळ सहज मॅनेज करता येऊ शकतं, पण त्यांना जी जनता निवडून देते तिला तुम्ही कसं मॅनेज कराल?

 

भाजपचे अमरीश पटेल धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये उडी मारत त्यांनी ही निवडणूक लढवली. यात मतदान केलं ते या दोन जिल्ह्यांतल्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका नि नगर परिषद सदस्यांनी. पटेल हे गेली तीन दशकं या जिल्ह्यांतलं एक बडं प्रस्थ. पक्कं कॉंग्रेस संस्कृतीत मुरलेलं. कॉंग्रेसचे ते कॅबिनेट मंत्रीही होते. माणसं मॅनेज करण्याची कला त्यांनी या संस्कृतीत लीलया आत्मसात केली असणारच. आता तर ते ज्या भाजपमध्ये गेलेत त्यांनी तर या कलेत कॉंग्रेसलाही शरमेनं मान खाली घालावी लागेल असं प्रावीण्य हस्तगत केलंय. साहजिकच माणसं फोडणं त्यांना फारसं अशक्य नव्हतं. शिवाय ज्या कॉंग्रेसचे मतदार त्यांनी फोडले ते तर त्यांच्याच आश्रयाखाली वावरत आले होते. पण ज्या धुमधडाक्यात त्यांनी ते करून दाखवलं ते पाहून भाजपमधल्या चाणक्यांनीही तोंडात बोटं घातली असतील. मविआ संख्याबळात सरस असतानाही तब्बल ११५ मतं फोडत पटेलानी २३४ मतांनी दणक्यात विजय मिळवला.

याउलट अशी माणसं मॅनेज करण्याची संधी फारशी नव्हती तिथे मात्र भाजपची पार दैना उडाली. पुणे पदवीधर आणि शिक्षक, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती पदवीधर अशा सर्वच सुशिक्षित मतदारांनी भाजपला झिडकारलं. पुणे नि नागपूर हे तर भाजपचे परंपरागत बालेकिल्ले. नागपूरमध्ये गेली ५५ वर्षं भाजपचा उमेदवार निवडून आलाय. अगदी देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधर फडणवीस नि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासहित. पुणे पदवीधर मतदारसंघाने महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सलग दोनदा निवडून दिलंय. अशा पार्श्वभूमीवर भाजपचे हे गड धडाधड कोसळतात नि तिथे मविआचे उमेदवार निवडून येतात याचा अर्थ संघ भूमीत दीक्ष्या भूमी चा विजय लावायचा?

 

सुशिक्षित मतदार हा भाजपचा कट्टर पाठीराखा. कॉंग्रेस ऐन भरात असतानाही त्याने भाजपची साथ कधी सोडली नव्हती. तो एक भाजपचा अभिमानाने मिरवण्याजोगा विषय होता. आम्हाला सुशिक्षित लोक मत देतात आणि तुम्हाला अडाणी, असं भाजप वर्षानुवर्षं कॉंग्रेसला हिणवत आलाय. मग आता असं अचानक काय घडलं की ज्यामुळे या सुशिक्षित लोकांनी भाजपकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला?

 

याचं मूळ भाजपने गेल्या वर्षभरात राज्यात केलेल्या किळसवाण्या राजकारणात दडलंय. विश्वासघात (?) केला म्हणून तुम्ही शिवसेनेवर तुटून पडलात तर लोकांची काहीच हरकत नाही. पण शिवसेनेवर कुरघोडी करण्याच्या नादात तुम्ही जर थेट महाराष्ट्राचीच मानहानी करायला निघालात तर लोक तुम्हाला कसं माफ करतील? शिवसेनेने साथ सोडल्यापासून भाजपची अवस्था सूडाने पेटलेल्या भ्रमिष्टासारखी झालीय. आणि त्या भ्रमात आपण करतोय ते योग्य की अयोग्य तेच त्यांना कळेनासं झालंय. गेल्या वर्षभरात याची वारंवार प्रचीती येतेय. अगदी महाराष्ट्र सर्वाधिक करोनाग्रस्त राज्य असतानाही आपले निधी पंतप्रधान फंडात जमा करण्यापासून ते पालघर हत्याकांड, सुशांतसिंग राजपूत, कंगना राणावत, अर्णब गोस्वामी अशा नाना प्रकरणांत भाजप जी महाराष्ट्रविरोधी भूमिका घेत गेला ती सर्वसामान्य माणसाला मुळीच आवडलेली नाही. त्याचंच प्रतिबिंब या विधान परिषद निवडणुकीत उमटलंय. कारण निवडणूक पदवीधर नि शिक्षकांच्या मतदारसंघांसाठी असली तरी ती शेवटी सामान्य माणसंच आहेत. त्यांचं मतदान हा लोकमताचा कौल आहे.

 

म्हणूनच हे निकाल म्हणजे भाजपसाठी एक धोक्याची घंटी आहे. लोकमत विरोधात जायला सुरुवात झाली की त्याचे असे पडसाद उमटू लागतात. त्यापासून धडा घेत सावरायचं की नाही हे त्यांच्या नेतृत्वाने ठरवायचंय. पण मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एकही जागा जिंकली नाही म्हणून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर मग कठीणच आहे. जनभावना विरोधात जातेय हे लवकर समजणं महत्त्वाचं असतं, कारण ते कळेपर्यंत मग फार उशीर झालेला असू शकतो... आणि एकदा ती पार विरोधात गेली की कपाळमोक्ष झालाच म्हणून समजा.दुसरी गोष्ट म्हणजे अमरावती शिक्षक मदादरसंघत बीजेपी उमेदवार कितव्या क्रमांकवार फेकला गेला याचे चिंतन बीजेपी ला नाही गिरे तो भी टांग उपर अशी अवसता आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.