अमरावती । प्रतिनिधीं
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील या प्रकारचा सर्वोत्तम महामार्ग ठरेल. या महामार्गाची कामे गतीने होत असून, येत्या सहा महिन्यात शिर्डीपर्यंत हा मार्ग खुला होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज अमरावती जिल्हयातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूरनजिक समृद्धी महामार्गाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार वीरेंद्र जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव अनिल गायकवाड, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधिक्षक हरी बालाजी आदी उपस्थित होते.
नागपूर- मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्गाची अमरावती जिल्ह्यातील लांबी सुमारे ७४ कि. मी. असून, मुख्यमंत्री ठाकरे यांनी पूर्ण झालेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली, तसेच सहा किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करून पाहणी केली व कामाचा दर्जा, गुणवत्ता व वेग याबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. समृद्धी महामार्गाची कामे लॉकडाऊन काळातही सुरू होती. त्यामुळे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा हा प्रकल्प आहे. हा महामार्ग देशातील सर्वोत्कृष्ट मार्ग ठरेल. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीपर्यंत येत्या १ मेपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. त्यानंतर पुढील वर्षात संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होऊन वाहतूक मुंबईपर्यंत सुरळीत होईल.
राज्यातील इतर रस्त्यांच्या बांधकामे गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नाशिकमधील 49 गावातून रस्ता
नागपूर ते मुबंई या 701 किलोमीटर मार्गवरील 101 किलोमीटरचा रस्ता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यातील 49 गावातून जातो. इगतपुरीमधील 23 तर सिन्नर मधील 26 गावांचा समावेश आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नावाने नावारुपाला येणाऱ्या या विकासाच्या महामार्गात नाशिकचे ही मोठे योगदान असून पहिल्या टप्प्यात नाशिक ते शिर्डी आणि दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते मुंबई असा रस्ता खुला होणार आहेत.
ठाण्यातील जमीन संपादित, परंतु शेतकरी मोबदल्याच्या प्रतिक्षेत
ठाणे जिल्ह्यातील पडघा गावातून समृद्धी महामार्गाची सुरुवात होते. तोच पुढे शहापूर तालुक्यातून हा महामार्ग जातो. या शहापूर तालुक्यात वेगाने गेल्या 1 ते 2 वर्षांपासून महामार्ग बनत आहे. जमिनी अधिग्रहित झालेल्या आहेत. त्यामुळे कामे पटापट होत आहेत. जमिनीचे सपाटीकरण करुन, भराव टाकण्याचे काम इथे सुरु आहे. तसेच अंडरपास बनवणे, डोंगर फोडून भुयार बनवणे अशी कामे देखील इथे सुरु आहेत. असे असताना इथला शेतकरी अजूनही प्रशासनाच्या मेहेरबानीची वाट बघतोय. कारण त्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेल्या आदर्श गाव अंदाड मधल्या सर्व शेतकऱ्यांनी मिळून सर्वात प्रथम स्वतःहून आपली जमीन राज्य सरकारला दिली. यामागे त्यांचा उद्देश हा जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची प्रगती इतकाच होता. मात्र असे असूनही आजतागायत या गावातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. त्यासाठी अनेक वर्षे तलाठी पासून ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालयातील अनेक अधिकाऱ्यांशी सतत पत्रव्यवहार केला जात आहे. तरीही या शेतकऱ्यांना कोणीही मदत करत नाही. या सर्व गरीब कष्टाळू शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन नसल्याने सरकारच्या मदतीची वाट बघावी लागत आहे.
समृद्धी महामार्गाविषयी सर्वकाही
- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग
- मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला आणि वाहतूक, दळणवळण, उद्योग, व्यापार यांना चालना देणारा तसेच असंख्य प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा प्रकल्प असल्याचं सांगितलं जातं.
- सध्या मुंबई ते नागपूर अंतर कापण्यास सुमारे 14 तास लागतात. जवळपास 812 किमी अंतर पडते. जर समृद्धी महामार्ग झाल्यास अंतर 700 किमी होईल आणि फक्त 8 तासात मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होईल. यासाठी देखरेख एजन्सी म्हणून एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) काम पाहणार आहे.
- समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यातून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबई!
- जवळपास 26 तालुके आणि 392 गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे.
- समृद्धी महामार्गामुळे काही राष्ट्रीय महामार्गही जोडले जाणार आहेत. यात NH3, NH6, NH7, NH69, NH204, NH211, NH50 यांचा समावेश होतो.
- महामार्गाची एकूण रुंदी 120 मीटर असणार आहे. प्रत्येक बाजूस चार-चार अशा आठ पदरी मार्गिका असणार आहेत. मध्य मार्गिका ही 22.5 मीटर आसणार आहे, जी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आहे.
- प्रस्तावित समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा 150 किमी प्रति तास आहे. जर भविष्यात परत महामार्गात वाढ करायची झाल्यास ती तरतूद आताच करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचे परत अधिग्रहण होणार नाही हे विशेष.
- महामार्गात हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने इ. उभारण्यात येणार आहे.
- जवळपास 50 पेक्षा जास्त उड्डाणपुल, 24 हून आधिक इंटरचेंजेस वे तसेच 5 बोगदे प्रस्तावित आहेत.
- हा महामार्ग खाजगी भागीदारीतून होणार असल्यामुळे टोलही पडणार आहे. टोल हा प्रवास केलेल्या अंतरावरच पडणार आणि तो स्वयंचलित असणार आहे
- युद्धजन्य परिस्थितीत अथवा नैसर्गिक आपत्ती दरम्यान महामार्गावर विमान उतरु शकेल असा रन वे असणार आहे.
- समृद्धी महामार्ग हा रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे काम करणार आहे. तब्बल 25 लाख रोजगाराची संधी उपलब्ध होईल असा दावा आहे.
- या प्रकल्पासाठी तब्बल 50 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी पन्नास हजार एकर जमीन लागणार आहे.
Leave a comment