जिल्ह्यात 131 केंद्रावर 64 हजार 349 मतदार
मतदान प्रक्रिया शांततेत, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त
बीड | वार्ताहर
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी आज दि.1 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरु झाली आहे.बीड जिल्ह्यात 131 मतदान केंद्र असून या ठिकाणी दुपारपर्यंत शांततेत 22 टक्के मतदान पुर्ण झाले असल्याची माहिती निवडणुक विभागाच्या वतीने देण्यात आले. दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 64 हजार 349 मतदारांपैकी 13 हजार 421 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिये दरम्यान सर्व मतदान केंद्र परिसरात आरोग्य पथक तैनात करण्यात आले असून येणार्या प्रत्येक मतदाराची थर्मल गनने तपासणी करुन सॅनिटाईज केले जात आहे. सर्व मतदान केंद्र परिसरात आवश्यक तो पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत यावेळी 30 पेक्षा अधिक उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. गत वीस दिवस प्रमुख उमेदवारांनी मराठवाड्यातील 76 तालुके प्रचारादरम्यान पिंजून काढले. या मतदारसंघासाठी एकुण 3 लाख 74 हजार 45 पदवीधर मतदार असुन आज बीड जिल्ह्यात या निवडणूकीच्या मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडत आहे.
आज दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात एकुण 22 टक्के मतदान पुर्ण झाले असून सर्वाधिक 23.66 टक्के मतदान गेवराई तालुक्यात झाले आहे. दुपारपर्यंत तालुकानिहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे:- बीड 20.97 टक्के, पाटोदा 21.95, आष्टी 20.71, शिरुर 20.49, वडवणी 22.41, अंबाजोगाई 20.05, माजलगाव 20.74, केज 18.94, धारुर 20.45, परळी 23.55. दरम्यान आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु राहणार आहे. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होवून अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.
Leave a comment