लॉक डाऊन शिथिल झाल्यावर प्रथमच बीडमध्ये नृत्य-गायनाची मेजवानी
बीड / वार्ताहर
लॉक डाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर प्रथमच संस्कार भारती आयोजित बीडचा सुप्रसिद्ध कनकालेश्वर मोहोत्सव मोजक्या श्रोत्यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन शिस्तीत संपन्न झाला. नांदेडचे सुप्रसिद्ध गायक संजय जोशी यांनी आपल्या गायनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.फेसबुक लाईव्ह मुळे हजारो रसिक श्रोत्यांनी या मैफिलीचा घरबसल्या आंनद घेतला.
प्रतिवर्षी चैत्र पाडव्याला नववर्षाच्या स्वागता प्रित्यर्थ संस्कार भरती बीडच्या वतीने येथील कनकालेश्वर मंदिराच्या प्रांगणात आणि जलाशयात तरंगता रंगमंच तयार करून नृत्य, नाट्य,संगीत ,साहित्य आदी विविध ललितकला सादर केल्या जातात मात्र करोना परिस्थितीमुळे हा मोहोत्सव तेव्हा रद्द करण्यात आला मात्र लॉक डाऊन शिथिल झाल्यावर संपन्न परंपरेत खंड नको म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या पूर्व संध्येला 24 व्या कनकालेश्वर मोहोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रमोद वझे यांनी प्रास्ताविक करताना दिली. मोहोत्सवाचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून झाला. संस्कार भारतीचे देवगिरी प्रांताध्यक्ष भरत लोळगे प्रांत सहमंत्री जगदीश देशमुख, महेश वाघमारे बीड जिल्हाध्यक्ष प्रमोद वझे,कुलदीप धुमाळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.संस्कार भारती गीतानंतर साई नृत्यालयाच्या विद्यार्थीनींनी अनुराधा चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील ' सूर निरागस होवो ' या गणेश वंदनेवर ' तिल्लाना ' ' प्रकारात प्रिती शेवंते, भक्ती जोशी , वैष्णवी सर्वज्ञ यांनी नृत्य सादर केले. नांदेड येथील प्रसिद्ध गायक संजय जोशी यांनी भक्तीगीत,भजन,गौळण,भावगीत आणि नाट्यगीतांचे गायन करीत सुंदर मैफल सादर केली. ' निजरूप दाखवा हो ', ' परब्रह्म निष्काम तो हा ', ' माझे जीवन गाणे गाणे ', ' तोच चंद्रमा नभात ', ' एक धागा सुखाचा ' आणि ' कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ' या गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.त्यांना हार्मोनियमवर सुधीर देशमुख, व्हायोलिनवर पंकज शिरभाते, तबल्यावर जगदीश देशमुख आणि टाळाची साथ मंगेश लोळगे यांनी केली.भरत लोळगे यांनी ' एक शिवाचे अतुल पुष्प हे ' हे गीत गायिले तेव्हा उपस्थित श्रोत्यांनी कनकालेश्वर मंदिरावर पुष्पवृष्टी केली.
यावेळी संस्कार भारतीच्या प्रांत प्रसिद्धी प्रमुख पदावर नियुक्ती झाल्याबद्दल महेश वाघमारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मोहोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्कार भारती बीडचे
प्रमोद वझे, संतोष पारगावकर, गणेश स्वामी, लक्ष्मीकांत सौंदत्तीकर ,प्रकाश मानुरकर, सौ स्नेहाताई पारगावकर, गणेश तालखेडकर, प्रा. राहुल पांडव, अनिल कुलकर्णी, सुजित देशमुख, डॉ रवि शिवणीकर, दिनेश लिंबेकर महेश देशमुख, अशोक कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश तालखेडकर आणि सुरेश साळुंके यांनी तर आभार प्रदर्शन संतोष पारगावकर यांनी केले. या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह अशोका कुलकर्णी यांनी केले.कार्तिक पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात आणि जलाशयात दिव्यांचा झगमगाट करण्यात आला होता.
Leave a comment