चंद्रपूर :
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी आज (30 नोव्हेंबर)आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. नातेसंबंध आणि महारोगी सेवा समितीमधील कलहाचा त्रास सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असंही सांगितलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी डॉ. शीतल आमटे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन महारोगी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांवर, विश्वस्तांवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. परंतु दबावामुळे त्यांनी एक दोन तासात हा व्हिडीओ हटवला. मात्र यानंतर डॉ. विकास आमटे, प्रकाश आमटे, मंदा आमटे आणि भारती आमटे यांनी पत्र काढून त्यांचे आरोप फेटाळले होते. त्यांची मानसिक आरोग्य फारसं ठीक नसून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
डॉ. शीतल आमटे या ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय. बाबा आमटे यांच्या नात होत्या. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरु असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले पण त्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.
दरम्यान डॉ. शीतल आमटे आज सकाळी पावणे सहा वाजता एक पेंटिंग शेअर केलं होतं. 'वॉर आणि पीस' असं या पेंटिंगला नाव देण्यात आलं आहे.
डॉ. शीतल आमटे यांनी काही महिन्यांपूर्वी व्हिडीओ ब्लॉगच्या माध्यमातून गेल्या होत्या. या निमित्ताने त्यांनी विविध विषयावर व्हिडीओ ब्लॉग बनवले होते. यावेळी त्यांनी आनंदवन जवळून अनुभवता आलं होतं. महत्त्वाचं म्हणजे डिप्रेशनमध्ये बाहेर कसं पडावं यावरही त्यांनी व्हिडीओ बनवला होता. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचं वृत्त अतिशय धक्कादायक आहे.
कोण होत्या शीतल आमटे?
शीतल आमटे या शिक्षणाने डॉक्टर होत्या. त्या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या नात होत्या. डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे त्यांचे आई-वडील आहेत. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या सेवाकार्याने वेगळी ओळख निर्माण केलेल्या महारोगी सेवा समितीच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.
भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांना सामाजिक क्षेत्रात कामाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. शीतल आमटे यांनी मशाल आणि चिराग या कार्यक्रमांची उभारणी केली होती. त्याच्या त्या संस्थापक होत्या. त्यांनी नुकतंच निजबल नावाचं एक सेंटरही सुरु केलं होतं. याअंतर्गत शारीरिक अपंगत्व आलेल्या नागरिकांना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांना विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करुन देण्यासाठी काम केलं जात होतं.
सध्या त्या आनंदवनला देशातील आदर्श स्मार्ट व्हिलेज बनवण्यासाठी देखील काम करत होत्या. या अंतर्गत आनंदवनमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरणपूरक उत्पादन आणि आर्थिक स्थैर्य अशा अनेक घटकांचा यात विचार करण्यात येत होता. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जानेवारी 2016 मध्ये त्यांना 'यंग ग्लोबल लिटर 2016' पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. त्यानंतर त्यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या तज्ज्ञांच्या पॅनलचं सदस्यत्व देखील देण्यात आलं होतं.
शीतल आमटे संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड इनोव्हेशन ऑर्गनायझेनच्या समन्वयक म्हणूनही काम करत होत्या. त्यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कामासाठीच 2016 चा रोटरी व्हॅकेशनल इक्सलन्स पुरस्कारही भेटला होता. त्या इंक फेलोवशिपच्याही मानकरी ठरल्या होत्या. त्या एक्स्प्रेस हेल्थ पुरस्कार आणि एक्स्प्रेस हेल्थकेअर पुरस्कार निवड समितीच्याही सदस्य होत्या. लॅन्सेट आयोगाने त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील नेतृत्वासाठी पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ (दिल्ली) या संस्थेच्या त्या सल्लागार होत्या.
Leave a comment