बीड । वार्ताहर
शहरातील भाजी मंडईतील एका तरुण व्यापार्याने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.27) समोर आली होती. पैशाचा तगादा लावून धमकावल्याने हतबल झाल्यमुळे त्याने आत्महत्या केली अशी फिर्याद मयताच्या भावाने दिल्यानंतर या प्रकरणात बीड,जालना व बुलढाणा जिल्ह्यातील पाच व्यापार्यांवर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला.
पोलीसांच्या माहितीनुसार, रसुल हबीब बागवान असे मयताचे नाव आहे. तो बीड शहरातील भाजी मंडईत फळविक्रीचे दुकान चालवायचा. त्याचे भाऊ हनिफ बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रसुल यांनी काही व्यापार्यांकडून पैसे घेतले होते. या पैशाच्या कारणावरुन रसुलला वारंवार धमकावले जावून शिवीगाळ केली जायची. या सततच्या त्रासाला कंटाळून रसुलने 26 रोजी विषारी द्रव प्राशन केले होते. उपचारादरम्यान त्याचा बीड स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी ईश्वरलाला टेकवाणी, रामेश्वर कदम, सुमेर पठाण (सर्व रा.बीड) शकिल जाफर बागवान (रा.अंबड,जि.जालना) व हाजीरा गफार रज्जाक बागवान (रा.चिखली,जि.बुलढाणा) या पाच व्यापार्यांवर बीड शहर ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. सहाय्यक निरीक्षक शेख या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Leave a comment