परळी । वार्ताहर
आधीच गटबाजीने त्रस्त असलेल्या भाजपाला पदवीधर निवडणूक अवघड असल्याचा प्रत्येय पुन्हा एकदा आला आहे. शिरीष बोराळकर यांनी गोपीनाथ गडाचे दर्शन घेतले खरे पण त्यांच्या प्रचारार्थ परळीत एक साधी बैठकही भाजपने घेतली नाही. राज्याचे आणि देशाचे दिग्गज नेते असलेल्या परळीत पदवीधर निवडणुकीची कुठलीच तयारी भाजपाकडून केली जात नसल्याचे चित्र दिसू लागले आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजपा या निवडणुकीसाठी किती गंभीर आहे याची चर्चा आता रंगू लागली आहे.
शिरीष बोराळकर यांनी नुकतेच गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.या नंतर त्यांची परळीत सभा किंवा एखादी बैठक होईल असे वाटले होते. मात्र याचे कुठलेही नियोजनच परळीतील नेतृत्वाने केले नसल्याचे समजले. आधीच मराठवाडा पदवीधर निवडणुकीत भाजपात अंतर्गत गटबाजी बोकाळली असतांना दुसरीकडे भाजपचा गड मानल्या जाणार्या परळीत पदवीधर उमेदवाराची बैठकही न झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. या आधी आपल्या नेत्याचा फोटो उमेदवाराच्या बॅनर वर नसल्याने बीड जिल्ह्यातील कार्यकर्ते नाराज असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. एकंदरीत आजतागायत शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ परळीत एक ही बैठक किंवा प्रचारसभा झाली नसल्याचे समजते.
Leave a comment