राज्यसभा सदस्य अहमद पटेल यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ऑक्टोबर महिन्यात पटेल यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्ली जवळ गुरगाव येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पटेल हे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते. गांधी कुटुंबाचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात ख्याती होती.
रीरातील बहुतांश अवयव निकामी झाल्याने बुधवारी पहाटे तीन वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विटद्वारे दिली.
'अत्यंत दुःखद मनाने कळविण्यात येतेय की माझे वडील अहमद पटेल यांचे आज पहाटे ३:३० वाजता निधन झाले आहे. महिनाभरापूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. परंतु त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि बहुतांश अवयव निकामी झाल्याने तब्येत खालावली होती. अल्ला त्यांना जन्नतुल फिरदौस प्रदान करो. मी त्यांच्या शुभचिंतकांना करोनाशी संबंधित कायदा-सुव्यवस्था नियमांचे पालन करून सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याची विनंती करतो.'
अहमद पटेल यांना १ ऑक्टोबर रोजी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्लीजवळच्या गुरगाव येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु १५ नोव्हेंबर रोजी प्रकृती खालावल्याने पटेल यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते.
अहमद पटेल यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
गांधी परिवाराच्या जवळचे असणारे नेते
अहमद पटेल यांचा जन्म 21 ऑगस्ट 1949 साली गुजरात मधील भरूच जिल्ह्यातल्या पिरामल गावात झाला होता.
80 च्या दशकात भरूच हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. अहमद पटेल इथून तीन वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून गेले होते. त्याच दरम्यान 1984 साली ते दिल्लीत काँग्रेसचे संयुक्त सचिव म्हणून पोहोचले. त्यानंतर ते तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव बनले.
1986 साली अहमद पटेल यांना गुजरात काँग्रेसचं अध्यक्ष बनविण्यात आलं.
फोटो स्रोत,GETTY IMAGES
1988 साली ते गांधी-नेहरू कुटुंबाद्वारे चालविल्या जाणाऱ्या जवाहर भवन ट्रस्टचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. हा ट्रस्ट सामाजिक कार्यासाठी निधी उपलब्ध करून देतो.
हळूहळू अहमद पटेल हे गांधी-नेहरू कुटुंबाच्या जवळचे म्हणून ओळखले जाऊ लागले. राजीव गांधी यांचा त्यांच्यावर जेवढा विश्वास होता, तेवढाच विश्वास सोनियांचाही अहमद पटेल यांच्यावर होता.
एक अभिन्न मित्र विश्वसनीय साथी निघून गेला : दिग्विजय सिंह
अहमद पटेल यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्वीट केलं आहे की, "अहमद पटेल आपल्यातून निघून गेले. एक अभिन्न मित्र विश्वसनीय साथी निघून गेलाय. आम्ही दोघंही 1977 पासून एकत्र होतो. ते लोकसभेत पोहोचले. मी विधानसभेत. आम्हा सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ते प्रत्येक राजकीय आजाराचं औषध होते. मृदुभाषी, व्यवहार कुशल आणि सदैव हसतमुख राहणं हिच त्यांची ओळख होती.
अहमद पटेल यांचा अल्पपरिचय
- जन्म - 21 ऑगस्ट 1949 (भरूच, गुजरात)
- 1976मध्ये पालिका निवडणुकीपासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात
- 1977 साली पहिल्यांदा खासदारपदी निवड
- 1985 - राजीव गांधींचे संसदीय सचिव म्हणून नियुक्ती
- एकूण 8 वेळा खासदार (3 लोकसभा, 5 राज्यसभा)
- काँग्रेसचे प्रमुख संकटमोचक म्हणून ओळख
- सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार
- 2004 साली सत्ता येऊनही मंत्रिपद घेतलं नाही
- पडद्यामागे काम करण्यास अधिक पसंती
- 2004-14 या काळात पक्ष आणि सरकारमधील महत्वाचा दुवा
- घटकपक्षांशी संवाद साधण्याची जबाबदारी
- कुटुंब - पत्नी, एक मुलगी, एक मुलगा
Leave a comment