तुळजापूर । वार्ताहर
मराठवाड्याच्या ओल्या दुष्काळाच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी तुळजापूरात होते. सकाळी पावासामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर दुपारी त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. सध्या नवरात्रही सुरू आहे. मात्र मंदिरं खुली ठेवण्यास सरकारची परवानगी नसल्याने मंदिराचं दार बंदच आहे. मुख्यमंत्री मंदिराच्या महाद्वाराजवळ गेले आणि तिथेच त्यांनी पूजा आणि आरती करत देवीचं बाहेरूनच दर्शन घेतलं.
नवरात्रीचा उत्सव त्यात तुळजापूरचा दौरा त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भवानी मातेच्या दर्शनाला गेले नसते तरच नवल. कोरोनाची प्रसार रोखण्यासाठी सरकारने जे नियम केले होते त्यानुसार सध्या मंदिरं ही बंदच आहेत. मंदिरं सुरू झाली तर लोकांची गर्दी होईल आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे मंदिर सध्या बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भाजपने या प्रश्नावरून राज्य सरकार विरुद्ध राज्यभर आंदोलन केलं होतं. हॉटेल्स, बार, दुकाने खुली करण्यास परवानगी दिली जाते मग देवांच्या मंदिरांना का नाही असा सवाल भाजपने केला होता. मात्र विरोधकांच्या दबावाला बळी न पडता मंदिरं खुली न करण्याचा निर्णय राज्य सरकारने कायम ठेवला आहे.
Leave a comment