भाजपच्या ३ ते ४ मोठ्या नेत्यांशी चर्चा - जयंत पाटील
मुंबई । वार्ताहर
]भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. तीन दशके भाजपमध्ये काम करून भाजपला बळ दिलं. त्यांनी त्यांचा पक्ष सोडलेला आहे असं मला सांगितलं. शुक्रवारी २ वाजता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
एकनाथ खडसेंच्या येण्याचे राष्ट्रवादीचे बळ वाढेल. भाजपमध्ये होणारा अन्याय अनेक लोकांनी पाहिला आहे. हळूहळू आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होईल. खडसेंबरोबर येण्याची अनेकांची इच्छा आहे. आम्ही त्यांना टप्पाटप्प्याने प्रवेश देणार आहोत. असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
खडसेंना काय द्यायचे याची चर्चा झालेली नाही, शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते पक्षात येत असल्याचं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
"एकनाथ खडसे यांच्यासह आणखी काही जण राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत. खूप लोक आमच्या पक्षात येणार असं मी म्हणणार नाही. परंतु ज्या नेत्यांना कार्यकर्त्यांचा, जनतेचा पाठिंबा आहे त्यांना नक्कीच आमच्या पक्षात यायचं आहे," असा दावाही जयंत पाटील यांनी केला.
भाजप पक्ष सोडतोय, घोषणा करताना एकनाथ खडसे झाले भावुक!
गेल्या 40 वर्षांपासून भाजपमध्ये काम करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजप पक्षातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. पक्षात बाहेर पडत असल्याची घोषणा करताना एकनाथ खडसे यांचा गळा भरून आला होता. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्यामुळे बाहेर पडत असल्याचे खडसेंनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आज एकनाथ खडसे यांनी या चर्चेला पूर्णविराम देत राष्ट्रवादीत जाण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.
'माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यांनी सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्रभर गोंधळ दाखल केला. पोलीस सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते , असा धक्कादायक खुलासा खडसेंनी केला.
'माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मी फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा, नाईलाजाने तक्रार दाखल करावी लागली, असं उत्तर फडणवीस यांनी दिले. ते तपास करून तक्रार दाखल करा, असं सांगू शकत होते. पण, अत्यंत खालच्या स्ताराचे राजकारण करण्यात आले, अशी टीकाही खडसेंनी केली.
'भारतीय जनता पक्षाचे 40 वर्षांपासून काम पाहत आलो. जेव्हा भाजप खेड्यापाड्यात पोहोचली नव्हती. तेव्हापासून गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह अनेक नेत्यांसोबत काम करत आलो. आतापर्यंत पक्षात काम करत असताना मला अनेक पदं मिळाली हे मी नाकारत नाही. मी कुठल्याही नेत्यावर टीका केली नाही. मी जेव्हा मुख्यमंत्रिपदाचा दावा केला होता, त्यानंतर माझ्यावर अनेक आरोप झाले. अनेक वेळा चौकशी झाल्या' असं खडसे यांनी सांगितले.
इतक्या दिवसांपासून खूप अत्याचार सहन केले. माझ्या चौकशीची मागणी कुणीही केली नाही. विधिमंडळातील रेकॉर्ड काढावे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कोणताही पक्षा असेल त्यांनी राजीनामा आणि चौकशीची मागणी केली नव्हती. पण भाजपने माझ्या राजीनाम्याची मागणी केली आणि राजीनामा घेतला. त्यानंतर मी चारवर्ष काढले. पण, मला काय मिळाले काही नाही. माझ्या कथित पीएवर नऊ महिने पाळत ठेवण्यात आली होती. एखाद्या मंत्र्याच्या पीएवर अशी पाळत ठेवणे हे धक्कादायक आहे. अशी माहिती विधानसभेत देण्यात आली आहे, असंही खडसे म्हणाले.
त्याचबरोबर शिवसेना आणि भाजप युती तोडण्याची माझी भूमिका नव्हती. युती तोडण्याचा निर्णय हा सर्वांनी मिळून घेतला होता. विरोधी पक्ष नेता असल्यामुळे मला फक्त घोषणा करावी लागली होती, असंही खडसेंनी सांगितलं.
समर्थकांकडून जल्लोष
दरम्यान भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या जळगावातील निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
भाजप नेत्यांची प्रतिक्रिया
खडसेंचा पक्षांतराचा निर्णय दुर्दैवी : रावसाहेब दानवे
एकनाथ खडसे यांचा पक्षांतराचा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. "एकनाख खडसेंचा निर्णय पक्षापेक्षा त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे. नाथाभाऊंनी भाजप सोडायला नको होता. खडसेंची समजूत काढण्यात पक्ष कुठेही कमी पडलेला नाही. दिल्या घरी सुखी राहा," असंही रावसाहेब दानवे म्हणाले.
ओ जानेवाले हो सके तो लौट के आना : सुधीर मुनगंटीवार
एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षाचा राजीनामा देणं ही चिंतनाची बाब असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी त्यांनी काहीशा काव्यात्मक शैलीत आपल्या भावना व्यक्त केल्या. 'ओ जानेवाले हो सके तो लौट के आना', 'सदा खूश रहो ये दुआ है हमारी' अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं.
अधिकृत माहिती मिळालेली नाही : देवेंद्र फडणवीस
अधिकृत माहिती मिळालेली नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष याबाबत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली.
एकनाथ खडसेंचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांना मिळाला : केशव उपाध्ये
एकनाथ खडसे यांचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्षांना मिळाला आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितलं. नाथाभाऊ जाऊ नये यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न केले. संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. खडसेंवर अन्याय झाला की नाही हा विषय व्यक्तिसापेक्ष आहे, असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादी प्रवेशानंतर नाथाभाऊ लगेच मंत्री होण्याची शक्यता
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी राष्ट्रवादीचा एक मंत्री राजीनामा देईल, त्या जागी एकनाथ खडसे मंत्री होती. तर जो मंत्री राजीनामा देईल तो प्रदेशाध्यक्ष होईल, असं म्हटलं जात आहे. दिलीप वळसे-पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांच्यापैकी एखादा मंत्री राजीनामा देणार असल्याची प्राथमिक शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास कसा होता?
१९८० मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, १९८७ मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. १९८९ मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (१९८९ – २०१९) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.
१९९५ ते १९९९ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये खडसेंनी अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारली होती. खडसेंनी नोव्हेंबर २००९ ते ऑक्टोबर २०१४ या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे.
२०१४ मध्ये एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते. पण अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल मंत्रालयाची धुरा होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपातून ३ जून २०१६ रोजी एकनाथ खडसेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत लिंबा पाटील यांनी १९८७ मतांनी त्यांचा पराभव केला.
राज्यातील विविध प्रश्न त्यांनी विधानसभेत प्रखरतेने मांडले आहेत. आपल्या भाषणातून कायम त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. १९९७ ते १९९९दरम्यान पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली व अपूर्ण कामे पूर्ण केली. कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत सिंचन प्रकल्पांनाही खडसेंनी गती दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी "प्रथम पुनर्वसन आणि नंतर सिंचन प्रकल्प" याचा पुरोगामी निर्णय घेतला. एकनाथ खडसेंनी उत्तर महाराष्ट्रासाठी तापी खोरे विकास महामंडळ स्थापन केले होते.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ खडसेंनी राज्यातील प्रत्येक तहसिलमध्ये एक आयटीआय स्थापन केली आणि अशा प्रकारे त्यांनी राज्यभरात ३५८ आयटीआय स्थापन केले आहेत. या आयटीआयमध्ये मुलींसाठी ३०% जागा राखीव ठेवण्याच्या महत्त्वपूर्ण प्रगतीशील निर्णय आणि काश्मीरमधील हिंदू शरणार्थींसाठी २% जागा राखीव ठेवण्याचा निर्णयही खडसेंनी घेतला. एकनाथ खडसेंनी ट्रस्ट रूग्णालयातील बीपीएल लाभार्थ्यांसाठी १० टक्के खाट आरक्षित करण्यासही सरकारला भाग पाडले.
विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी
एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे त्यांनी अनेकदा विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आकडेवारी, पुराव्यांसह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत होते. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना एकनाथ खडसेंनी सलग साडे आठ तास भाषण करून विक्रम नोंदवला. याच भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकनाथ खडसेंचा विशेष सन्मान केला.
Leave a comment