मुंबई । वार्ताहर
कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात दिसू लागल्यापासून ST महामंडळाने सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद केली होती. लॉकडाऊन काळात जिल्हाबंदी लागू करण्यात आल्यामुळे ही प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद होती. मात्र, अनलॉक सुरू करण्यात आल्यामुळे टप्प्याटप्प्याने ही वाहतूक सुरू करण्यात आली. याआधी उठवण्यात आलेल्या निर्बंधांनंतर निम्म्या अर्थात ५० टक्के प्रवासी क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यामुळे एका सीटवर एकच प्रवाशाला बसण्यास परवानगी होती. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र, आता ST महामंडळानं घेतलेल्या नव्या निर्णयानुसार पूर्ण क्षमतेनं एसटी चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे एसटीमध्ये आता सर्व सीट्सवर प्रवासी बसण्यास मुभा असणार आहे. मात्र, त्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे.
एसटी महामंडळाने पूर्ण क्षमतेनं एसटी चालवण्याची परवानगी दिली असली, तरी प्रवास करताना प्रवाशांना मास्क आणि सॅनिटायझरचे नियम पाळणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याशिवाय, प्रवासी वाहतुकीसाठी काढण्यात आलेली बस निर्जंतुकीकरण करूनच प्रवाशांना बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, याआधी ५० टक्के क्षमतेच्या नियमात फक्त एकच आसन आरक्षणासाठी उपलब्ध असायचे. आता मात्र पूर्वीप्रमाणेच सर्व आसने आरक्षणासाठी उपलब्ध असणार आहेत.
दरम्यान, एकीकडे एसटी महामंडळाने हा निर्णय जरी घेतला असला, तरी त्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नसताना, रुग्णसंख्या अजूनही झपाट्याने वाढत असताना आणि राज्यभर कोरोनाचा फैलाव झालेला असताना अशा प्रकारे पूर्ण क्षमतेने एसटीने प्रवासी वाहतूक केल्यास सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडेल आणि कोरोना अधिक वेगाने पसरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
काय आहेत अटी –
– बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायजर लावणं बंधनकारक
– वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतूक करुनच मार्गस्थ करण्यात याव्यात
– लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवाशी अशा तिरप्या (Z) पद्धतीने आरक्षण उपलब्ध आहे. तथापी पूर्ण आसनक्षमतेने वाहतूक सुरु होत असल्याने सर्व आसने पूर्वीप्रणाणे आरक्षणासाठी उपलब्ध करुन द्यावीत.
दोन आसनांमध्ये पडदा लावण्याचा प्रस्ताव नाकारला
दरम्यान राज्य सरकारकडून दोन आसनांमध्ये पडदा लावण्याचा प्रस्ताव नाकारण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन विभागाला यासंबंधी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यांनी म्हटलं आहे की, “बसमधील दोन आसनांमध्ये पडदा लावणं इष्ट वाटत नाही. तसेच खासगी प्रवासी वाहतूक दोन प्रवाशांमध्ये पडदा लावून होत नाही. विमान व ट्रेनमध्येही पडदे नाहीत. सध्या करोनामुळे वाहतूक क्षमतेच्या १०० टक्के होत नाही. त्यामुळे पडद्याशिवाय वाहतूक करणं योग्य वाटतं”.
Leave a comment