चौसाळ्यात अँटीजन तपासणीत ३१ पॉझिटिव्ह
चौसाळा -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तो थांबवण्यासाठी आणि त्याची साखळी तोडण्यासाठी चौसाळा शहरातील व्यापाऱ्यांची अँटीजेन तपासणी ता. १४ व १५ सप्टेंबर रोजी करण्यात आली. यामध्ये ७४० व्यापारी, व्यावसायिक व अँटीजेन चाचणीतील पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात आली त्यापैकी ३१ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना अधिक वाढू नये व त्याची साखळी तुटावी म्हणून चौसाळा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास खाकरे व येथील व्यापारी, गांवकरी यांच्याशी चर्चा करून सर्वानुमते चौसाळा शहरात आजपासून पाच दिवस जनता कर्फ्यु पाळण्यात येणार असल्याची माहिती चौसाळा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बी. ए. चव्हाण यांनी दिली.
तसेच चौसाळा आणि परिसरातील नागरिकांनी कोरोना सदृश लक्षणं जाणवल्यास घाबरून न जाता तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन आपली तपासणी करुन घ्यावी याठिकाणी आता अँटीजेन तपासणीची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास खाकरे यांनी दिली.
Leave a comment