मुंबई । वार्ताहर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे गेल्या एक वर्षभरातील कार्यक्रम, दौरे आणि भेटीगाठींच्या फोटोंचं संकल असलेल्या पुस्तकाचं आज राजभवनात प्रकाशन झालं. ‘जन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी’ असं हे पुस्तक आहे. या कार्यक्रमानंतर राज्यपालांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यात त्यांनी कधी सूचक विधान केलं तर कधी टोले लगावले. राज्यपालांनी अशा सगळ्या विषयांवर बोलणं हे तसं दुर्मिळ मानलं जातं त्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झालंय. राज्यपाल म्हणाले, मी राज्यसेवक आहे राज्यपाल नाही.
राज्यपाल आणि शासन यात मतभेद
राज्यपाल आणि सरकारमध्ये मतभेद नाहीत पण दोन भांडी असेल तर काही तर वाजणारं. माझे मतभेद नाहीत सगळेच माझे मित्र आहेत.
नेत्यांची टीका
ज्या लोकांनी माझ्यावर टीका केली ते मोठे आहेत.त्यांच्यावर काय बोलणार. आपली जीभ दाताखाली आली तर जीभ तोडत नाहीत. आपलीच माणसे आपल्यावर बोलले तर नाराजी कशाला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊत यांनी राज्यपालांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर त्यांनी हे वक्तव्य केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात कोरोनाचं संकट असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात फिरत नाहीत अशी टीका केली जाते असा प्रश्न विचारल्यावर राज्यपाल म्हणाले, आपल्याला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. काय होतं आहे ते महत्वाचं. मी कुणाच्या कामात हस्तक्षेप करत नाही. कोणी विचारलं तर सल्ला देण्याचं काम करतो असं मत मांडले.
मुख्यमंत्री अथवा मंत्री यांनी एकदा विषय नाकारला असेल तर त्यास न्याय देण्याच काम राज्यपाल कडे असतं. राज्यपाल सुनावणी करतात. माझ्याकडील प्रलंबित विषय पुढील काळात संपवेल. असे सांगत राज्यपाल यांनी भविष्यात राज्यात अधिक सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत.
कंगना प्रकरण
राज्यपाल यांनी कंगना प्रकरण पहिल्यांदा भाष्य केले. ते म्हणाले, माझं ह्याच्याशी काही देणंघेणं नाही मी कधी नाराज होतो असे मी म्हटले नाही. जे नाराज असतील त्यांनी ते छापले असेल असे सांगत राज्यपाल नाराज असलेल्या बातमीचं खंडन केले.
राज्यपाल नियुक्त आमदार
या विषयावर सुद्धा राज्यपालांनी स्पष्ट मत मांडत महाविकास आघाडी नेत्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मुद्दे ही सुस्त, गवाह चुस्त, ज्यांना नाव पाठवायचं आहे ते नाव पाठवत नाही आणि राज्यपालांना शिव्या देणार हे बरोबर नाही.
पहाटेचा शपथविधी
राज्यपालांनी पहिल्यांदाच थेटपणे या प्रकरणावर भाष्य केलं. पहाटेला रामप्रहर म्हणतात, मग कोणी पहाटे शपथ घेतली तर 'प्रहार' का करतात?
राज्यपाल म्हणतात, फडणवीस-पवारांनी 'रामप्रहरी' शपथ घेतली तर काय बिघडलं?
विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेदरम्यान राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींवर शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाष्य केले. त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हायला नव्हती पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भल्या पहाटे आटोपण्यात आलेल्या शपथविधीचेही त्यांनी समर्थन केले. या वेळेला रामप्रहर म्हणतात. मग रामप्रहरी शपथ घेतली तर प्रहार कशाला करता, असा सवाल राज्यपालांनी उपस्थित केला.
आज राजभवनावर राज्यपालांच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यांनी म्हटले की, मी एक वर्ष अजून मुंबईत राहिलो तर पूर्णपणे मराठीत बोलेन. महाराष्ट्राचे राज्यपाल बनायचे आहे हे सांगितले तेव्हा विश्वास बसत नव्हता. मी आलो तेव्हा वादळी पाऊस होता, नंतर राजकीय पाऊस पडला. त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हायला नव्हती पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
तसेच कोरोनाच्या काळात राज्य सरकारने चांगले काम केल्याची पोचपावतीही राज्यपालांनी यावेळी दिली. राज्य सरकारशी माझा कोणताही संघर्ष नाही. सर्वजण माझे मित्र आहेत. उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरच्या निवडीवेळीही मी नियमाप्रमाणे वागलो. त्यावेळी ज्यांनी १२ विधानपरिषद सदस्यांची नावे पाठवणे अपेक्षित होते, ती पाठवली नाही. नंतर राज्यपालांना शिव्या देण्यात आल्या, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले. तसेच कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. निर्भीड आणि सावध राहून कोरोनाचा सामना करण्याची गरज असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.
'धोतर आणि कुर्ता घालतो तर लोकांना वाटते मला इंग्रजी येत नसेल'
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या कार्यक्रमात अनेक विषयांवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यांनी म्हटले की, अनेकांना वाटते मी धोतर आणि कुर्ता घालतो म्हणजे मला इंग्रजी येत नसेल. महाराष्ट्रात मी आतापर्यंत अनेक ठिकाणी फिरला आहे. मला फिरण्याची आवड आहे. कोरोनाची साथ येण्यापूर्वी मी नंदूरबार आणि गडचिरोलीच्या दुर्गम भागात गेलो होतो. तेथील गावांमध्ये मुक्काम केला होता, अशी आठवणही यावेळी राज्यपालांनी सांगितली.
घाबरून न जाता सावधानता बाळगत कोरोनाला हरवूया
कोरोनाच्या भीतीमुळे घाबरून न जाता निर्भीड बना आणि सावधानता बाळगून कोरोनाला हरवू या असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिला.'जनराज्यपाल: भगतसिंह कोश्यारी' या सचित्र पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन राजभवन येथे झालेल्या छोटेखानी सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यावेळी उपस्थित होते.
राज्यपालपदी नियुक्ती होऊन 5 सप्टेंबरला एक वर्ष झाले त्यानिमित्त वर्षभरातील कार्याचा सचित्र अहवाल या पुस्तकरूपाने मांडण्यात आला आहे. राज्यपाल यावेळी म्हणाले, गेल्या वर्षभरात मी राज्यातील सुमारे २० जिल्ह्यांचा दौरा केला. राज्यातील दुर्गम भाग असलेला गडचिरोली, नंदुरबार, पालघर याभागाचा दौरा केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 'मोलगी' या गावामध्ये मी मुक्काम केल्याचा अनुभवही राज्यपालांनी यावेळी सांगितला. कोरोनाकाळातही दौरे केल्याचे त्यांनी सांगितले.
वर्षभराच्या काळात २५० शिष्टमंडळांनी भेट घेतल्याचे सांगताना राज्यपाल म्हणाले, प्रत्येक दिवस हा कामाचा असतो त्यामुळे सुटीच्या दिवशीही काम करण्याचा माझा प्रयास असतो असे त्यांनी सांगितले. प्रत्येक बाबतीत ईच्छा तेथे मार्ग या उक्तीनुसार काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. यासंदर्भात राज्यपालांनी ५० मिनिटात शिवनेरी पायी चढून गेल्याचे उदाहरण दिले. यावेळी राज्यपालांनी वर्षभराच्या कालावधीत केलेल्या विविध बाबींचा आढावा घेतला.
वर्षपूर्तीनिमित्तचे ई बुक राजभवनच्या संकेतस्थळावर ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये क्यूआरकोड आणि ई लिंकचाही वापर करण्यात आला आहे. यावेळी राज्यपालांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली.
Leave a comment