बीड | वार्ताहर
बीड शहरासह माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी या शहरात सध्या असलेले प्रशासनाचे निर्बंध आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी एका आदेशाद्वारे शिथील केले आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने या सहा शहरात श्रीगणेश मुर्तीची दुकाने किराणा, फळे, भाजीपाला, दुध, मेडिकल, पुजेच्या साहित्याची दुकाने तसेच हार व फुलांची घाऊक व किरकोळ विक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे, संपूर्ण जिल्ह्यातील या दुकानांमुळे गर्दी होवु नये यासाठी सदरील दुकाने शहरातील, गावातील, वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्णपणे पसरलेली राहतील आणि एकाच ठिकाणी, रस्त्यावर दुकाने राहणार नाहीत याची जबाबदारी संबंधीत नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायतची राहिल. तसेच सुशोभिकरण, साहित्य विक्री, मिठाई दुकाने, हॉटेल व रेस्टॉरंट यांना व इतर सर्व प्रकारच्या दुकानांना उघडण्यास परवानगी असणार नाही. या विषयाचे आदेश स्वतंत्रपणे देण्यात येतील. सर्वांनी कोविड विषयक खबरदारी पाळूनच कामकाज करावे तसेच अॅन्टिजेन टेस्टची मोहीम सुरु आहे ती चालु राहील. कंटेन्मेंट झोनमधील निर्बंधही तसेच कायम राहणार आहे. असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
Leave a comment