बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात सुटणार बसेस;ग्रामीण फेर्याही सुरू
बीड । वार्ताहर
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून थांबलेली एसटीची चाके पुन्हा धावणार असल्यामुळे ग्रामीण रस्त्यासह एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रवाशांना मुभा मिळणार आहे. बीडचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी ही माहिती दिली.
बीड जिल्ह्यातील सर्व आठ आगारातून आज गुरुवारपासून (दि.20) सर्व नियते सुरू होणार आहेत. त्यानुसार औरंगाबाद, जालना, लातूर, परभणी, अहमदनगर उस्मानाबाद आदी आंतरजिल्ह्यात एसटीने प्रवास करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. तसे आदेश प्रशासनाने दिले असून,चालक वाहक व इतर कर्मचार्यांना कर्तव्यावर हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एसटीचा प्रवास सुखाचा हे ब्रीद घेऊन पुन्हा एकदा नव्या उमेदीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लालपरी रस्त्यावर धावण्यास सज्ज झाली आहे.गेल्या महिन्यापूर्वी जिल्हा बंदीचे आदेश पाळत फक्त ग्रामीण भागात एसटी सुरूच आहे,मात्र ऐच्छिक ठिकाणी जाता येत नसल्याने प्रवाशी संख्या कमी राहिली.आता 22 प्रवाशी व सर्व नियम पाळून एसटीची आंतरजिल्हा प्रवाशी वाहतूक सुरू झाली आहे.त्यात दररोज एसटी सॅनिटराईज करण्यात येईल,तसेच प्रवाषांनाही विना मास्क फिरता येणार नाही.तिकिटाचे दर हे पूर्वीप्रमाणेच असून,कुठलीही भाडेवाढ अथवा बदल झाला नसून,दुप्पट भाडे असल्याच्या अफवा आहेत.
सर्वच फेर्या सुरू होतील
ग्रामीण भागातील नियते पूर्वीप्रमाणे प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन सोडली जातील. इतर जिल्ह्यात प्रवासी प्रतिसादा नुसार बस पाठविण्यात येतील.प्रवाशांनी सहकार्य करावे. त्यानंतर हळुहळू टप्प्याटप्प्याने सर्वच नियते सुरू होतील अशी माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली.
Leave a comment