बीड । वार्ताहर
शहरातील एका 73 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचार सुरु असताना शनिवारी (दि.1) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. सदरील वृध्द महिलेस रक्तदाब आणि थॉयराईडचा आजार होता अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
सदरील वृध्द सेवानिवृत्त महिलेला घरात बाथरुममध्ये पडल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेव्हा त्यांची कोरोना चाचणीही घेण्यात आली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथे त्यांना श्वसनाचा त्रास होवू लागल्याने व्हेन्टिलेटरही लावण्यात आले होते. यातच सायंकाळी त्यांचे निधन झाले. दरम्यान कोरोनामुळे जिल्ह्यात आजपर्यंत 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आत्तापर्यंत 428 रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या प्राप्त अहवालानुसार 428 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण 15 हजार 05 स्वॅब नमुने तपासलेले आहे. पैकी 781 व्यक्तींचे अहवाल कोरोना विषाणू बाधित आले आहेत तर 14 हजार 224 अहवाल निगेटिव्ह आले. त्यापैकी बाधित रुग्णांवर उपचारानंतर 428 रुग्ण बरे झाले आहेत.सध्या एकुण 325 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. मध्यम 54 व सौम्य 73 लक्षणे आहे. तर 183 रुग्णांना लक्षणे नाहीत.
जिल्ह्यात 10 ठिकाणी पूर्णवेळ संचारबंदी
बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे अंबाजोगाई अंबाजोगाई शहरातील कुरेशी गल्ली-सदरबाजार,मोची गल्ली-मिलिंद नगर, परळी शहरातील शंकर पार्वती नगर,विवेकानंद नगर, बँक कॉलनी,अरुणोदय मार्केट व शिरोळे गोपीनाथ गल्ली तसेच परळी तालुक्यातील टोकवाडी (संपूर्ण), गेवराई तालुक्यातील महारटाकळी-चकलांबा फाटा, पाटोदा तालुक्यातील मस्केवस्ती या गावात व वरील संबंधित परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. सर्व संबंधित ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येवून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहेत.
सहा ठिकाणची संचारबंदी शिथिल
बीड, परळी शहरातील आणि गेवराई तालुक्यातील काही ठिकाणीप्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविण धरमकर यांनी दिले आहेत.बीड शहरातील संत नामदेव नगर,माऊली कॉलनी, परळी शहरातील गुरुकृपानगर, बरकतनगर, सर्वेश्वरनगर, गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील बालाजी गल्ली या ठिकाणी संबंधित परिसरातील कन्टेनमेंट झोन शिथील करण्यात आले आहे या भागात संबंधित परिसरातील परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत.
Leave a comment